Join us

रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 08:10 IST

सवलत मिळाल्याने पेट्रोलच्या किमती उतरणार?

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: रशियन तेलाच्या वाढत्या आयातीवरून अमेरिकेकडून भारतावर दबाव वाढला आहे. याचवेळी रशियाभारतीय खरेदीदारांना आणखी मोठ्या सवलती देत आहे. ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार, आता भारतास रशियाच्या कच्च्या तेलावर प्रतिबॅरल ३ ते ४ डॉलर सूट मिळणार आहे. गेल्या आठवड्यात २.५० डॉलरची, तर जुलैमध्ये १ डॉलरची सूट मिळत होती. भारतीय रिफायनरीजनी खरेदी केलेले अमेरिकन कच्चे तेल ३ डॉलर महाग पडत आहे.

अमेरिकेसोबत वाटाघाटी सुरू-गोयल

वाणिज्य व उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले की, व्यापार करारासंदर्भात अमेरिकेसोबत वाटाघाटी सुरू आहेत. आतापर्यंत चर्चेच्या ५ फेऱ्या झाल्या आहेत. भारतीय पुरवठा साखळी सक्षम आहे आणि कोणत्याही देशावर अवलंबून नाही. ‘भारत आत्मनिर्भर होत आहे. भारताला जागतिक आव्हान पेलण्याचा आत्मविश्वास मिळतोय, असे ते म्हणाले.

टॅरिफमुळे पुरवठा साखळीला धक्का

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे वाहन क्षेत्राची जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून भारतासह जपान, जर्मनी आणि दक्षिण कोरिया या देशांतून अमेरिकेत येणारे वाहनांचे सुटे भाग महाग झाले आहेत. अमेरिका हा सर्वांत मोठा खरेदीदार असल्यामुळे या क्षेत्रातील छोट्या पुरवठादार कंपन्या दबावाखाली आल्या आहेत. लाखो रोजगार धोक्यात आले आहेत.

भारताला संधी कशी?

भारतात कमी वेतनात कामगार उपलब्ध असल्यामुळे जर्मनी, जपान आणि कोरिया यांच्या तुलनेत भारताची उत्पादने कमी खर्चात तयार होतात. याचा फायदा भारताला ऑटो पार्ट्सच्या निर्यातीत होऊ शकतो.

भारत-चीन संबंध  सामान्यतेकडे

  • भारत-चीन संबंध हळूहळू सामान्यतेकडे जात आहेत. सीमा प्रश्न सुटत गेले की तणाव कमी होणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे, असे वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी सांगितले. 
  • आमच्या नातेसंबंधात गलवानमुळे एक अडथळा आला होता. मात्र सीमा प्रश्न सुटत गेले की परिस्थिती पूर्ववत होणे हे स्वाभाविक आहे, असे गोयल म्हणाले. 
  • सध्या सीमालगत देशांमधून येणाऱ्या सर्व थेट परकीय गुंतवणुकीसाठी (एफडीआय) सरकारी मंजुरी घेणे बंधनकारक आहे. देशांतर्गत उद्योग क्षेत्र सरकारला हे नियम शिथिल करण्याची मागणी करत आहे.

भारताची व्यापार तूट का वाढली?

  • २००३–०४     १.१ 
  • २०२४-२५    ९९.२
  • २०२४-२५  (एकूण तूट)    २८२
टॅग्स :खनिज तेलरशियाभारतचीन