Crude Oil News: अमेरिकेनं रशिया आणि इराणकडून तेल खरेदी करण्यासाठी दिलेली सवलत आता अधिकृतपणे संपवली आहे. या निर्णयाचा भारतावर व्यापक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. होर्मुज सामुद्रधुनीतून (Hormuz Strait) होणाऱ्या तेल आयातीतील तूट भारतानं रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करून भरून काढली होती. मात्र, आता रशियन तेलाची खरेदी बंद झाल्यामुळे भारतीय रिफायनर्सच्या अडचणीत वाढ होऊ शकते. भारत हा जगातील कच्च्या तेलाचा तिसरा मोठा आयातदार देश असून आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो.
अमेरिकेचा निर्णय आणि सवलतीची मुदत
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी व्हाईट हाऊसमध्ये सांगितले की, अमेरिका रशियन आणि इराणी तेलावर दिलेली सवलत वाढवणार नाही. ही सवलत ११ मार्चपूर्वी लोड केलेल्या तेलासाठी देण्यात आली होती. रशियन तेलावरील सवलत शनिवारी संपली आहे, तर इराणवरील सवलतीची मुदत रविवारी संपत आहे. ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही सवलत न वाढवण्याचे संकेत आधीच दिले होते.
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
होर्मुज संकट आणि भारताची रशियाकडून खरेदी
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजांची ये-जा बंद झाली होती. जगातील २०% कच्चं तेल आणि एक तृतीयांश गॅस याच मार्गावरून येतो. भारताचा बहुतांश पुरवठा याच मार्गावर अवलंबून असल्यानं देशात इंधनाची स्थिती गंभीर झाली होती. अशावेळी अमेरिकेच्या सवलतीमुळे भारतीय रिफायनरींना रशियन तेल खरेदी करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी रशियाकडून सुमारे ३० दशलक्ष बॅरल कच्चं तेल खरेदी केलं.
महत्त्वाचे आकडे:मार्चमध्ये भारतानं रशियाकडून दररोज सरासरी १.९८ दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले, जे जून २०२३ नंतरचं उच्चांकी प्रमाण आहे.एप्रिलमध्ये हा आकडा १.५७ दशलक्ष बॅरलपर्यंत खाली आला, कारण 'नयारा एनर्जी'ची रिफायनरी देखभालीसाठी बंद होती.चालू महिन्यात डिलिव्हरीसाठी भारताने रशियाकडून सुमारे ६० दशलक्ष बॅरल तेल खरेदी केलं आहे.
समुद्रात रशियन तेलाचा साठा आणि पुढील आव्हानं
गेल्या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेच्या दबावामुळे भारताने रशियाकडून खरेदी कमी केली होती. त्यामुळे जानेवारीच्या सुरुवातीला रशियाचं न विकलेले सुमारे १५५ दशलक्ष बॅरल तेल समुद्रात जहाजांमध्ये पडून होतं. सध्याही रशियाचे सुमारे १०० दशलक्ष बॅरल तेल जहाजांमध्ये भरलेले आहे, त्यापैकी काही कार्गो भारताने आधीच विकत घेतलेत. यातील ४ दशलक्ष बॅरल तेल भारतात पोहोचलं देखील आहे.
भारतावरील परिणाम आणि पर्यायी व्यवस्था
रशिया आणि इराणवरील निर्बंधांमुळे भारताची डोकेदुखी वाढू शकते, कारण रशिया भारताला कच्चे तेल पुरवणारा सर्वात मोठा देश आहे. मात्र, भारत सरकारचं म्हणणं आहे की देशात कच्च्या तेलाचा पुरेसा पुरवठा असून विविध स्रोतांकडून आयात सुरू आहे. सरकारनं एलपीजी आयातीमध्येही विविधता आणली आहे. पूर्वी जेथे १० देशांकडून एलपीजी आयात केला जात होता, ती संख्या आता १५ वर पोहोचली आहे.
Web Summary : US ends oil waivers for Russia, Iran. India, a major importer, faces challenges as Russian oil access diminishes due to Hormuz Strait tensions. Alternatives are being explored.
Web Summary : अमेरिका ने रूस, ईरान को तेल छूट खत्म की। प्रमुख आयातक भारत को होर्मुज जलडमरूमध्य तनाव के कारण रूसी तेल पहुंच कम होने से चुनौती। विकल्प तलाशे जा रहे हैं।