Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 17:25 IST

Rupee Vs Dollar : वर्षभरात रुपया आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत ६ टक्के घसरला आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तो आणखी खाली जाण्याचा अंदाज आहे.

Rupee Vs Dollar : २०२५ या वर्षात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत आशिया खंडातील सर्वात कमकुवत चलन ठरला आहे, जो या वर्षात सुमारे ६% घसरला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही वक्तव्य व्हायरल होत आहेत. "पगार रुपयात मिळतो आणि खर्चही रुपयात होतो, मग डॉलर महागला तर मला काय?" पण हा विचार म्हणजे निव्वळ 'फसवणूक' आहे. प्रत्यक्षात, डॉलरच्या तुलनेत रुपया जेव्हा जेव्हा 'नवा नीचांक' गाठतो, तेव्हा तुमच्या स्वयंपाकघरापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत प्रत्येक गोष्टीचे बजेट कोलमडते. सध्या रुपया एका 'अनचार्टेड टेरिटरी' म्हणजेच एका अज्ञात प्रदेशात आहे, जिथे तो किती खाली जाईल, हे सांगणे कठीण झाले आहे.

रुपयाचा आजवरचा प्रवास : १९४७ ते २०२५

  • काही सोशल मीडिया मीम्सनुसार १९४७ मध्ये १ डॉलर म्हणजे १ रुपया होता, पण हे पूर्णपणे असत्य आहे. 'थॉमस कूक'च्या ऐतिहासिक आकडेवारीनुसार, स्वातंत्र्यावेळी १ डॉलरची किंमत ३ रुपये ३० पैसे होती.
  • १९६६ चे आर्थिक संकटात रुपयाचे अवमूल्यन होऊन तो ७.५० रुपयांवर पोहोचला.
  • १९९१ चे उदारीकरण धोरण स्वीकारल्यानंतर रुपयाने पहिल्यांदा २० रुपयांची पातळी ओलांडली.
  • २०१२ नंतर रुपयाची घसरण थांबलेली नाही आणि २०२५ संपता संपता तो ९१ रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकावर पोहोचला आहे.

रुपया घसरण्याची ५ प्रमुख कारणे१. परकीय गुंतवणूकदारांचे पलायन : एकट्या २०२५ मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सुमारे १८ अब्ज डॉलर काढून घेतले आहेत. हे गुंतवणूकदार रुपया विकून डॉलर खरेदी करत असल्याने डॉलरची मागणी वाढली आणि रुपया कमकुवत झाला.

२. भारत-अमेरिका व्यापार युद्ध : अमेरिकेने भारतावर लावलेले टॅरिफ आणि नवीन व्यापारी धोरणांमधील अनिश्चिततेमुळे रुपया आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलव ठरले आहे.

३. आयात बिलाचा बोजा : भारत आपल्या गरजेच्या ८०% पेक्षा जास्त कच्चे तेल आणि मोठ्या प्रमाणात सोने आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात या वस्तू महागल्याने भारताला जास्त डॉलर मोजावे लागत आहेत.

४. आरबीआयचे नवीन धोरण : पूर्वी रुपया सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक डॉलर विकायची. मात्र, यावेळी आरबीआयने रुपयाला बाजाराच्या हवाली सोडून दिले आहे, जेणेकरून भारतीय निर्यातीला फायदा मिळावा.

तुमच्या खिशावर होणारा थेट परिणाम

  • रुपया घसरला की परदेशातून येणारी प्रत्येक गोष्ट महाग होते.
  • कच्चे तेल डॉलरमध्ये खरेदी करावे लागते. डॉलर महागला की पेट्रोल-डिझेल महागते. यामुळे वाहतूक खर्च वाढून दूध, भाजीपाला आणि गॅस सिलिंडरच्या किमती वाढतात.
  • तुम्ही वापरत असलेले मोबाईल आणि लॅपटॉप महाग होतात.
  • जर तुमचे मूल परदेशात शिकत असेल, तर तुम्हाला फी भरण्यासाठी जास्त रुपये देऊन डॉलर विकत घ्यावे लागतील.
  • जे लोक परदेशात नोकरी करतात किंवा ज्यांची पगाराची रक्कम डॉलरमध्ये येते, त्यांना रुपया घसरल्यामुळे जास्त पैसे मिळतात.

वाचा - कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'

कधी लागणार 'ब्रेकर'?पुढील वर्षीच्या सुरुवातीला रुपया ९२ पर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी, एक आशेचा किरण आहे. 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये रुपया पुन्हा सावरू शकतो आणि तो डॉलरच्या तुलनेत ८७ रुपयांपर्यंत मजबूत होऊ शकतो. अर्थात, हे सर्व भारत-अमेरिका व्यापार करार कशा प्रकारे पार पडतो, यावर अवलंबून असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Rupee hits 91: Inflation impacts kitchen, education, and more.

Web Summary : The rupee's fall to 91 against the dollar impacts Indians significantly. Rising import costs, foreign investment outflows, and global trade tensions are key factors. This weakens purchasing power, raising prices for essentials like fuel, education, and imported goods, affecting household budgets.
टॅग्स :भारतीय चलनटॅरिफ युद्धखनिज तेलमहागाईशेअर बाजार