Rupee All-Time Low: जागतिक बाजारपेठेतील आर्थिक उलथापालथ आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया शुक्रवारी त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी स्तरावर पोहोचला. आता १ डॉलरसाठी ९२.४२ रुपये मोजावे लागणार आहेत. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेल्यामुळे भारतीय रुपयावर प्रचंड दबाव निर्माण झालाय. आरबीआय (RBI) परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असली, तरी वाढत्या किमती ही मोठी समस्या बनत चालली आहे.
रुपयानं तोडले सर्व विक्रम
या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच १३ मार्च, शुक्रवारी रुपयाने ९२.४२ ही आजवरची सर्वात नीचांकी पातळी गाठली. यापूर्वीच्या सत्रात रुपया ९२.३५७५ वर पोहोचला होता, मात्र आजची घसरण त्यापेक्षाही अधिक ठरली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेली मोठी विक्री, मजबूत डॉलर आणि देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण ही रुपयावर दबाव वाढण्याची मुख्य कारणं असल्याचं फॉरेक्स ट्रेडर्सचं म्हणणं आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया ९२.३३ वर उघडला होता, मात्र त्यानंतर तो घसरून ऐतिहासिक नीचांकी स्तरावर आला.
रुपया घसरण्यामागचं सर्वात मोठं कारण
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाचा थेट परिणाम रुपयाच्या घसरणीवर होत आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जगातील अनेक देशांमध्ये ऊर्जा संकट उभं राहिलं आहे. 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) येथून होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडलेत.
भारतातील अनेक शहरांमध्ये सध्या एलपीजी तुटवड्याचा सामना करावा लागत असून अनेक रेस्टॉरंट्स बंद झाली आहेत. सरकारनं घरगुती वापराच्या गॅसचे दरही वाढवले आहेत. भारत आपल्या तेल आणि वायूच्या गरजेचा मोठा भाग आयात करत असल्यानं या सर्व जागतिक घडामोडींचा रुपयावर प्रचंड ताण पडत आहे.
परिस्थिती कधी सुधारणार?
रुपयातील मोठी घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी हस्तक्षेप करत असते. मात्र, जोपर्यंत मिडल ईस्ट मधील तणाव कमी होत नाही, तोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता कमी आहे. देशातील तेल आणि गॅस संकट टाळण्यासाठी भारत सरकार इतर पर्यायांचा शोध घेत आहे. परंतु, रुपया घसरल्यामुळे आता भारताला आयातीसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Web Summary : The Indian Rupee plunged to a record low against the US dollar due to global economic turmoil and rising crude oil prices. The rupee's fall is attributed to geopolitical tensions in the Middle East disrupting oil supplies, increasing import costs for India, and putting pressure on the RBI.
Web Summary : वैश्विक आर्थिक उथल-पुथल और कच्चे तेल की बढ़ती कीमतों के कारण भारतीय रुपया डॉलर के मुकाबले रिकॉर्ड निचले स्तर पर आ गया। मध्य पूर्व में भू-राजनीतिक तनावों के कारण तेल आपूर्ति बाधित होने से भारत के लिए आयात लागत बढ़ गई है, जिससे आरबीआई पर दबाव बढ़ गया है।