Join us

३३०० कोटी रुपये फेडले, अनिल अंबानींची कंपनी झाली कर्जमुक्त; ४३८७ कोटी रुपयांचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 13:48 IST

Reliance Anil Ambani Company: अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीनं आर्थिक आघाडीवर मोठा टप्पा गाठला आहे. त्यांच्या कंपनीवरील कर्ज शून्यावर आलंय. पाहा कोणती आहे ही कंपनी.

Reliance Anil Ambani Company: अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीनं आर्थिक आघाडीवर मोठा टप्पा गाठला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं बँका आणि वित्तीय संस्थांकडील आपलं स्टँडअलोन नेट डेट शून्यावर आणलं आहे. म्हणजेच कंपनीकडे आता बँका आणि वित्तीय संस्थांचं कोणतंही कर्ज नाही. कंपनी स्टँडअलोन तत्त्वावर कर्जमुक्त झाली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ३३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडलंय. कंपनीनं एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली.

४३८७ कोटींचा नफा

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं चौथ्या तिमाहीत ४३८७ कोटी रुपयांचा एकत्रित नफा कमावला आहे. तर मार्च २०२५ तिमाहीत कंपनीचा समायोजित एबिटडा तिमाही आधारावर ६८१ टक्क्यांनी वाढून ८८७६ कोटी रुपये झालाय. संपूर्ण आर्थिक वर्षात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा करोत्तर एकत्रित नफा ४,९३८ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीला १६०९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीचा एकत्रित एबिटडा दुपटीनं वाढून १२,२८८ कोटी रुपये झाला असून ऑपरेटिंग उत्पन्न ७ टक्क्यांनी वाढून २३,५९२ कोटी रुपये झालं आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची एकत्रित नेटवर्थ ३१ मार्च २०२५ पर्यंत १४,२८७ कोटी रुपयांवर पोहोचली. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ८,४२८ कोटी रुपये होता.

Zepto चे सीईओ आदित पालिचांनी स्पर्धक कंपनीच्या CFO वर केला मोठा आरोप; म्हणाले, "आमच्या गुंतवणूकदारांना..."

१६०० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या पाच वर्षांत १६०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीचा शेअर २९ मे २०२० रोजी १६.७० रुपयांवर व्यवहार करत होता. २६ मे २०२५ रोजी कंपनीचा शेअर २९१.९० रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये १९० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात ७१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३५०.९० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १४३.७० रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्सव्यवसाय