Join us

'या' शेअरनं पकडला 'बुलेट' सारखा स्पीड; स्टॉकमध्ये ८ टक्क्यांपर्यंतची मोठी तेजी, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:04 IST

Eicher Motors Share Price : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ जानेवारीला शेअर बाजारात बंपर उसळी पाहायला मिळाली. या सकारात्मक वातावरणात या शेअरनं तुफान स्पीड पकडला.

Eicher Motors Share Price : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ जानेवारीला शेअर बाजारात बंपर उसळी पाहायला मिळाली. या सकारात्मक वातावरणात गुंतवणूकदारांनीरॉयल एनफिल्ड बाईक आणि व्यावसायिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या आयशर मोटर्स लिमिटेडच्या शेअर्सवर (Eicher Motors Share Price ) उड्या घेतल्या. रॉयल एनफिल्डच्या विक्रीच्या आकडेवारीमुळे आयशर मोटर्सच्या शेअरकडे गुंतवणूकदार आकर्षित झाले आहेत.

शेअरची कामगिरी कशी?

२ जानेवारी रोजी आयशर मोटर्सचा शेअर ८ टक्क्यांनी वधारून ५२४२.९० रुपयांवर पोहोचला. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या वर्षी जानेवारीत हा शेअर ३,५६४ रुपयांवर होता. हा शेअर २०२४ मध्ये १६% वधारला होता आणि २०२० पासून दर वर्षी सकारात्मक वार्षिक परतावा दिला आहे. आयशर मोटर्स कव्हर करणाऱ्या ४२ विश्लेषकांपैकी २१ विश्लेषकांचे शेअरवर बाय रेटिंग दिलंय. यापैकी १२ विश्लेषकांनी 'होल्ड' रेटिंग दिलंय, तर ९ विश्लेषकांनी शेअर विकण्याचा सल्ला दिलाय.

काय म्हटलंय कंपनीनं?

आयशर मोटर्सनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, डिसेंबर महिन्यात रॉयल एनफिल्डची विक्री २५ टक्क्यांनी वाढून ७९,४६६ युनिट झाल्याचं म्हटलं. तर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी ६३,८८७ युनिट्सची विक्री केली होती. आकडेवारीनुसार, ३५० सीसीपर्यंत इंजिन क्षमता असलेल्या रॉयल एनफिल्ड मॉडेलच्या विक्रीत २५% वाढ झाली असून ती ६९,४७६ युनिट्सवर पोहोचली.

याशिवाय ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या मॉडेल्सची विक्रीही सुमारे १० हजारांनी वाढली आहे. रॉयल एनफिल्ड मोटारसायकलची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढून ११,५७५ युनिट झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत आयशर मोटर्सची रॉयल एनफिल्डची विक्री ६ टक्क्यांनी वाढून ७.२७ लाख युनिट झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ६.८५ लाख युनिट्सची विक्री झाली होती.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकरॉयल एनफिल्ड