Join us

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर, रेपो रेट जैथे; EMI वर काय परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:47 IST

RBI Monetary Policy: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं आहे.

RBI Monetary Policy: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं आहे. रिझर्व्ह बँकेकडून यावेळी रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ४ टक्के इतका कायम ठेवण्यात आलेला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के इतका राहणार आहे. 

आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) ऋण ७.३ टक्के इतकं राहणार असल्याची माहिती शक्तीकांत दास यांनी दिली. पण मान्सूनच्या आगमनामुळे देशाच्या आर्थिक उत्पन्नात येत्या काळात वाढ होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. देशाची आर्थिक प्रगती पुन्हा रुळावर आणण्यासाठी पॉलिसी सपोर्टची अतिशय महत्वाची भूमिका आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार खुंटल्यानं चालू आर्थिक वर्षासाठीच्या विकासाचा अंदाजित दर देखील घटविण्यात आला आहे. आरबीआयच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात अपेक्षित विकासाचा दर ९.५ टक्के इतका राहील. याआधी आरबीआयनं हाच दर १०.५० टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त केला होता. जोवर कोरोनाचं संकट जात नाही तोवर आपल्याला परिस्थितीशी जुळवून घेऊनच आर्थिक गतीचा दृष्टीकोन ठेवावा लागेल, असं शक्तीकांत दास म्हणाले. जागतिक बाजाराला चालना मिळाल्यास देशाच्या निर्यातीतही सुधार होईल, अशी आशा दास यांनी व्यक्त केली आहे. 

महागाईचं वाढतं प्रमाण लक्षात घेता रिझर्व्ह बँकेनं पतधोरणात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट आरबीआयनं जैसे थे ठेवल्यानं गृहकर्ज दारांच्या व्याजदरातही कोणताही बदल होणार नाही.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास