Join us  

शिलकीतील २५ हजार टन कांदा खराब होण्याची शक्यता, नाफेडची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 2:17 AM

Onion Price News : आतापर्यंत नाफेडने ४३ हजार टन कांदा बाजारात उतरविला आहे. आणखी २२ हजार टन कांदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात उतरविला जाईल. 

नवी दिल्ली : टंचाईच्या काळात पुरवठा सुरळीत राहावा यासाठी तयार करण्यात आलेल्या शिलकी साठ्यातील २५ टक्के म्हणजेच सुमारे २५ हजार टन कांदा यंदा खराब होऊ शकतो, असे नाफेडने म्हटले आहे.सरकारी मालकीचा सहकारी विपणन महासंघ असलेल्या नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक एस. के. चढा यांनी सांगितले की, कांद्याचे आयुष्य साडेतीन महिन्यांचे असते. नंतर त्यातील पाणी संपून जाऊन तो खराब होतो. शिलकी साठ्यासाठी आम्ही मार्च-एप्रिलपासून कांदा खरेदी करीत आहोत. आतापर्यंत नाफेडने ४३ हजार टन कांदा बाजारात उतरविला आहे. आणखी २२ हजार टन कांदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात उतरविला जाईल. उरलेला २५ हजार टन कांदा आर्द्रता संपून खराब होईल. कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने गेल्या वर्षापासून  कांदा साठा ठेवण्यास सुरुवात  केली. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षी ५७ हजार टन कांद्याचा साठा करण्यात आला. त्यातील ३० हजार टन कांदा खराब झाला. केवळ २७ हजार टन कांदा वितरित होऊ शकला. यंदा परिस्थिती चांगली आहे. आम्ही १ लाख टन कांदा साठा करणार आहोत. त्यापैकी केवळ २५ हजार टन कांदा खराब होण्याची शक्यता आहे. देशात कांद्याचे भाव गगनाला भिडल्यानंतर केरळ, आसाम, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीप यांच्याकडून ३५ हजार टनांची मागणी आली होती. नाफेडकडून प्रतिकिलो २६ रुपये अधिक वाहतूक खर्च या दराने कांदा पुरविला जातो.  एका अधिकाऱ्याने सांगितले की, कांद्याचे दर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. सरकारने कांदा आयातीचे नियम शिथिल केले आहेत. सरकारी विपणन संस्था एमएमटीसीला लाल कांदा आयातीसाठी निविदा मागविण्यासही सांगण्यात आले आहे. दरम्यान सरकारने देशभरात कांद्याचे दर किलोमागे दहा रूपयांनी कमी होत असल्याचा दावा केला आहे. 

नवा शिल्लकी साठा करणे सुरूसरकारने नाफेडला नवा शिलकी साठा तयार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, नाफेडने नव्या हंगामातील कांद्याची खरेदी सुरू केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही वर्षभर साठा अद्ययावत करीत आहोत. जुना साठा बाजारात उतरवून नवा साठा केला जातो.

टॅग्स :कांदानाशिकव्यवसाय