Join us

आता कोक आणि पेप्सीची वेळ! मुकेश अंबानींना रोखण्यासाठी खेळला मोठा डाव, काय आहे योजना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 15:04 IST

Campa Coke And Pepsi : कोक आणि पेप्सीने मुकेश अंबानी यांच्या ब्रँड कॅम्पासोबत स्पर्धा करण्यासाठी कंबर कसली आहे. कॅम्पाने मार्जिन कमी करुन बाजार पेठेत खळबळ उडवून दिली.

Campa Coke And Pepsi : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं तिथं आपला दबदबा निर्माण केला आहे. रिलायन्स जिओ हे त्याचं ताजं उदाहरण आहे. जिओच्या एन्ट्रीनंतर टेलिकॉम मार्केटमधील डझनभर कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा नव्या क्षेत्रात उडी घेतली आहे. शीतपेयांच्या बाजारात अंबानी आपलं नवीन उत्पादन सादर करणार आहे. परिणामी मार्केटमधील मोठे खेळाडू कोका-कोला, पेप्सिको यांचे धाबे दणाणले आहेत. काही दिवसांपूर्वी रिलायन्सने कॅम्पा नावाचे आपले शीतपेय बाजारात सादर केलंय. त्यामुळे कडाक्याच्यात थंडीत शीतपेयांचा बाजार चांगलाच तापू लागला आहे. कॅम्पाला रोखण्यासाठी आता कोका-कोला आणि पेप्सिकोने कंबर कसली आहे.

शीतपेयांच्या बाजारपेठेवर डोळाकोका-कोला, पेप्सिको आणि कॅम्पा ब्रँडचे मालक असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या मोठ्या कंपन्या त्यांचे वितरण आणि उत्पादन क्षमता वाढविण्यात व्यस्त आहेत. देशातील शीतपेयांची बाजारपेठ २०१९ मध्ये ६७,१०० कोटींवरून २०३० पर्यंत १.४७ लाख कोटींवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

जुबिलेंट भरतिया समूहाने कोका-कोला इंडियाच्या बॉटलींग कंपनी हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (HCCB) मधील १२,५०० कोटींमध्ये ४०% भागभांडवल विकत घेतल्यानंतर बाजारात आपली रणनीती सुधारत आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स (RCPL) देखील आक्रमक खेळी खेळत आहे. कंपनी आपला कॅम्पा ब्रँड विविध माध्यमांद्वारे उत्तर आणि पश्चिमेकडील बाजारपेठांमध्ये विस्तारत आहे. यासाठी त्यांनी स्विगी इंस्टामार्ट सारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मशी हातमिळवणी केली आहे. कंपनीने हा ब्रँड सुमारे २ वर्षांपूर्वी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पुन्हा लाँच केला होता. शीतपेय देशभर पसरवण्यासाठी कंपनीचा मार्जिक कमी करुन विक्री वाढवण्याचा उद्देश आहे.

पेप्सिकोची योजनापेप्सिकोचा बॉटलिंग पार्टनर वरुण बेव्हरेजेस देखील QIP द्वारे ७,५०० कोटी रुपये उभारून भांडवल जमा करत आहे. कंपनीचे अध्यक्ष रवी जयपुरिया यांनी सांगितले की सुमारे ४० लाख दुकानांमध्ये शीतपेयांचे वितरण केले जाते. जे एकूण FMCG बाजाराच्या सुमारे ३५% आहे. यावरून ग्रोथची क्षमता किती आहे हे दिसून येते. ते म्हणाले की कंपनी वितरणाचा विस्तार करत आहे. कारण बाजारपेठ मोठी असून ग्राहक पॅकेज केलेल्या शीतपेयांसाठी संवेदनशील आहेत. मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी आपल्या नवीन बाजारपेठांमध्ये नवीन व्हिसी-कूलर इन्स्टॉल करत आहे.

बिस्लेरी कंपनी या स्पर्धेत उतरणारबाटलीबंद पाण्याची कंपनी बिस्लेरी इंटरनॅशनल आपल्या सॉफ्ट ड्रिंक पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. कंपनीचे सीईओ अँजेलो जॉर्ज म्हणाले की, कंपनी कार्बोनेटेड शीतपेयांच्या बाजारपेठेतील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी लिमोनाटा, रेव्ह, पॉप आणि स्पायसी जीराच्या उत्पादनासह पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. ग्लोबल रिसर्च फर्म कंटारच्या म्हणण्यानुसार, अनेक एमएमजीसी उत्पादनांच्या मागणीवर महागाईचा परिणाम दिसून येत आहे. परंतु, सॉफ्ट ड्रिंक मार्केटवर त्याचा प्रभाव दिसत नाही.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सव्यवसाय