Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स १.१५ लाख कोटींची हिस्सेदारी विकून होणार कर्जमुक्त, मुकेश अंबानी यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 03:13 IST

सौदी अरेबियाची अ‍ॅरॅमको आणि ब्रिटनची बीपी पीएलसी यांना १.१५ लाख कोटी रुपयांची हिस्सेदारी विकून रिलायन्स इंडस्ट्रीजला १८ महिन्यांत ‘शून्य-शुद्ध कर्ज संस्था’ (झीरो-नेट डेब्ट फर्म) करण्यात येईल.

मुंबई : सौदी अरेबियाची अ‍ॅरॅमको आणि ब्रिटनची बीपी पीएलसी यांना १.१५ लाख कोटी रुपयांची हिस्सेदारी विकून रिलायन्स इंडस्ट्रीजला १८ महिन्यांत ‘शून्य-शुद्ध कर्ज संस्था’ (झीरो-नेट डेब्ट फर्म) करण्यात येईल, अशी घोषणा रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोमवारी केली. आपल्या तेल आणि रसायन व्यवसायातील हिस्सेदारी रिलायन्स विकणार आहे, असे अंबानी यांनी सांगितले.रिलायन्स समूहाच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. अंबानी यांनी सांगितले की, सौदी अरेबियाच्या अ‍ॅरॅमकोला रिलायन्स आॅईल अँड केमिकल्स या कंपनीतील २० टक्के हिस्सेदारी विकली जाईल.या हिस्सेदारीचे उद्यम मूल्य (इंटरप्राईज व्हॅल्यू) ७५अब्ज डॉलर आहे. ब्रिटनच्या बीपी समूहास कंपनीच्या पेट्रोलपंप आणि हवाई इंधन सुविधेतील ४९ टक्के हिस्सेदारी विकली जाईल. रिलायन्स समूहास बीपीकडून ७ हजार कोटी रुपये मिळतील.मुकेश अंबानी यांनी सांगितले की, सौदी अरेबियाकडून येणारी ही गुंतवणूक रिलायन्स समूहाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी विदेशी गुंतवणूक ठरणार आहे. तसेच भारतातीलही ती सर्वांत मोठी विदेशी गुंतवणूक ठरणार आहे. अ‍ॅरॅमको ही जगातील सर्वांत मोठी कच्चे तेल निर्यातदार कंपनी आहे. गुजरातेतील जामनगर येथील रिलायन्स जोड तेल शुद्धीकरण प्रकल्पास दररोज ५ हजार बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा अ‍ॅरॅमकोकडून केला जाणार आहे.बीपी समूहाने याआधी २०११ मध्ये रिलायन्स गॅस व्यवसायातील ३० टक्के हिस्सेदारी ७.२ अब्ज डॉलरला खरेदी केली होती. गेल्या आठवड्यात दोन्ही कंपन्यांनी भारतात भागीदारी उद्यम स्थापन करण्याची घोषणा केली होती. रिलायन्सचे १,४०० पेट्रोलपंप आणि ३१ हवाई इंधन स्थानके या भागीदारी उद्यमकडे हस्तांतरित केली जाणार आहेत. भागीदारी उद्यममधील ४९ टक्के हिस्सेदारी बीपी समूहाकडे असेल. उरलेली ५१ टक्के हिस्सेदारी रिलायन्सकडे असेल.स्टार्टअप्सना अर्थसहाय्यस्टार्टअप्सद्वारे व्यवसायात उतरणाऱ्यांना शिक्षण, कौशल्य विकास, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये आर्थिस सहाय्य देणार असल्याचे आणि प्रसंगी गुंतवणूक करणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले.१४ स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.१८ महिन्यांत कर्जफेड अंबानी यांनी सांगितले की, ३० जून २०१९ रोजी रिलायन्स समूहावर २,८८,२४३ कोटींचे कर्ज होते. दूरसंचार पायाभूत उद्यमातील टॉवर आणि अन्य मालमत्तांचे मौद्रिकीकरण केल्यानंतर हे कर्ज १,५४,४७८ कोटींवर येईल. १८ महिन्यांत म्हणजेच ३१ मार्च २०२१ पर्यंत ते फेडण्याची योजना आहे. अ‍ॅरॅमको व आणि बीपीसोबतच्या व्यवहारातून १.१५ लाख कोटी मिळण्याची अपेक्षा आहे.डेटा सेव्ह करा रिलायन्सच्या मेमरीत : येत्या काळात क्लाउड सेवा सुरू करणार असल्याचेही रिलायन्सने जाहीर केले. कंपनी देशभरात डेटा सेंटर सुरू करणार असून त्यासाठी मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी करारही केला आहे. या डेटा सेंटरला मायक्रोसॉफ्टच्या अ‍ॅझ्यूर या क्लाउड सेवेचे सहाय्य मिळेल. १ जानेवारी २०२० पासून ही सेवा सुरू होणार असून, त्यानंतर युझर्सना आपला डेटा रिलायन्सच्या या क्लाउड मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवता येणार आहे. ही सेवा स्टार्टअप्सना मोफत देणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स