उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड'ला (RIL) व्हेनेझुएलातून कच्चे तेल थेट खरेदी करण्यासाठी अमेरिकेकडून परवाना मिळाला आहे. या परवानगीमुळे रिलायन्स सवलतीच्या दरात मोट्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करू शकेल. महत्वाचे म्हणजे, हे तेल रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीसाठी अत्यंत अनुकूल मानले जाते. तसेच, यामुळे कंपनीचा रिफाइनिंग मार्जिन सुधारण्यास मदत होणार आहे.
अमेरिकेकडून निर्बंध शिथिल -पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने जानेवारी अखेरीस काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांना व्हेनेझुएलातून थेट तेल खरेदीची परवानगी दिली आहे. यापूर्वी अमेरिकेच्या निर्बंधांमुळे थेट खरेदीवर बंदी होती आणि तेलाची विक्री व्यापाऱ्यांमार्फत केला जात होता. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या लष्करी कारवाईत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना बंदी बनवून कारागृहात टाकण्यात आले, तेव्हापासूनच हे निर्बंध शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
महत्वाचे म्हणजे, रिलायन्स इंडस्ट्रीजकडून अमेरिकेच्या निर्बंधांपूर्वी, व्हेनेझुएलाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या ते करेदी केले जात होते. मात्र, व्हेनेझुएलातील मादुरो सरकारवर अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर २०१९-२० मध्ये ही आयात थांबवण्यात आली होती. यानंतर, २०२४ मध्ये देण्यात आलेल्या तात्पुरत्या सवलतीदरम्यान रिलायन्सने व्हेनेझुएलातून तेल खरेदी केले. या वर्षी, व्यापाऱ्यांमार्फत तेल खरेदी पुन्हा सुरू झाली होती. तेव्हा, रिलायन्सने विटोलकडून २० लाख बॅरल तेल खरेदी केले. याशिवाय, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडलाही या सवलतीचा फायदा झाला. या दोन्ही सरकारी तेल कंपन्यांनीही एकत्रितपणे व्हेनेझुएलामधून २० लाख बॅरल एवढे कच्चे तेल खरेदी केले होते.
गेल्या आठवड्यात काय म्हणाले ट्रम्प ? -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, पंतप्रधान मोदी रशियाकडून तेल खरेदी कमी करून अमेरिकेसह इतर स्रोतांकडून आयात वाढवण्यास सहमत आहेत. सूत्रांच्या मते, रशियाकडून आयात कमी होत असताना व्हेनेझुएलाचा पर्याय भारतासाठी महत्त्वाचा ठरतोय. तेलाच्या स्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या भारताच्या रणनीतीचा हा एक भाग आहे.