Reliance Impots Ethane Gas : अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाने जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडवली आहे. या युद्धामुळे अनेक कंपन्यांनी चीनमधून आपला व्यवसाय इतर देशांत हलवण्यास सुरुवात केली आहे. यापैकीच एक महाकाय कंपनी म्हणजे ॲपल. ॲपलसह अनेक कंपन्यांनी त्यांचे व्यवसाय चीनमधून भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ॲपल भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. साहजिकच, चीनला हे आवडलं नाही. त्यांनी आपले अभियंते आणि तंत्रज्ञांना मायदेशी बोलावले आहे. यावर आता भारताही जोरदार प्रत्त्युत्तर देण्याची तयारी करत आहे.
फॉक्सकॉनचा चीनला धक्का, भारताला फायदा!अलिकडेच असे वृत्त आले आहे की, ॲपल फोनची निर्मिती करणारी कंपनी फॉक्सकॉनने चीनमधील त्यांचे अभियंते आणि तंत्रज्ञ परत पाठवले आहेत. फॉक्सकॉनचा दक्षिण भारतात ॲपलचा मोठा प्लांट आहे, जिथे आयफोनचे उत्पादन वेगाने सुरू होते. चीनमधून अभियंत्यांना परत पाठवल्याने उत्पादन वेग थोडा मंदावू शकतो, पण यामागे चीनचा भारतावरील दबाव असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, अमेरिका आणि चीनमधील या व्यापार युद्धाचा भारताला मोठा फायदा मिळू शकतो. विशेषतः, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला याचा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.
रिलायन्ससाठी इथेन गॅसची मोठी संधी'STL किजियांग' नावाचे एक जहाज अमेरिकेतून इथेन (Ethane) गॅस घेऊन थेट गुजरातला पोहोचत आहे. हा इथेन गॅस दहेजमधील रिलायन्सच्या टर्मिनलवर पोहोचणार आहे. २०१७ मध्ये रिलायन्सने येथे एक युनिट बांधले होते, जिथे या इथेन वायूपासून इथिलीन (Ethylene) रसायन तयार केले जाते. हे इथिलीन प्लास्टिक आणि इतर अनेक उत्पादनांसाठी वापरले जाते.
मुकेश अंबानींनी किरकोळ आणि डिजिटल व्यवसायातून सुमारे ५७ अब्ज डॉलरचा (अंदाजे ४.७० लाख कोटी रुपये) व्यवसाय उभा केला असला तरी, तेल ते रसायने (Oil-to-Chemicals) हा त्यांचा जुना आणि मोठा कमाईचा स्रोत आहे. यातून त्यांना वर्षाला सुमारे ७४ अब्ज डॉलर (अंदाजे ६.१२ लाख कोटी रुपये) उत्पन्न मिळते.
इथेन का महत्त्वाचा?पूर्वी रिलायन्स किंवा इतर कंपन्या इथिलीन रसायन बनवण्यासाठी नॅफ्थाचा (Naphtha) वापर करत असत. नॅफ्था हे कच्चे तेल शुद्ध करून तयार केले जाते. परंतु, नॅफ्थामधून इथिलीन तयार करताना फक्त ३० टक्के वायूचा योग्य वापर करता येत असे. याउलट, इथेन ८० टक्क्यांपर्यंत नफा देते, म्हणजेच ते अधिक कार्यक्षम (Efficient) आहे.
अशा परिस्थितीत, इथेन गॅस हा अधिक प्रभावी पर्याय बनल्याने, येत्या काळात भारताचे उत्तर अमेरिकेवरील, विशेषतः रिलायन्ससारख्या कंपन्यांवरील अवलंबित्व किती वाढेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जरी देशाची अर्थव्यवस्था अजूनही तेलावर अवलंबून असली तरी, भविष्यात इथेनवरील अवलंबित्व वाढल्यास देशाच्या संपूर्ण इंधन अर्थव्यवस्थेत मोठा बदल दिसून येऊ शकतो.
सध्या अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध थांबले असले तरी, भारताचा इथेनचा वापर चीनच्या तुलनेत खूप कमी आहे. यामुळे, येत्या काळात भारत मोठ्या प्रमाणात इथेन खरेदी करू शकतो, ज्यामुळे भारतीय उद्योगांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.