Anil Ambani News: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांच्या हातातून अखेर रिलायन्स कॅपिटल निसटली आहे. हिंदुजा समूहातील इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IIHL) या कंपनीनं कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटलचं अधिग्रहण पूर्ण केलंय. कंपनीनं रिलायन्स कॅपिटलच्या निविदेची संपूर्ण रक्कम कर्जदारांना हस्तांतरित करून हा व्यवहार निकाली काढला आहे. आयआयएचएलचं अध्यक्ष अशोक हिंदुजा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. अनिल धीरूभाई अंबानी समूहाचा भाग असलेल्या आरकॅपच्या संचालक मंडळाला भारतीय रिझर्व्ह बँकेनं नोव्हेंबर २०२१ मध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील त्रुटी आणि देयक चुकवल्याबद्दल निलंबित केलं होतं. यानंतर आरबीआयनं नागेश्वर राव वाय यांची कंपनीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.
आमच्याकडून व्यवहार पूर्ण झाला आहे. जेव्हा आपण बोलत आहोत तेव्हा एका एस्क्रो खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जात असतात. रिलायन्स कॅपिटलच्या (आरकॅप) व्यवस्थापनाचे हस्तांतरण बुधवारी होण्याची शक्यता आहे. रिलायन्स कॅपिटलचा मूल्यनिर्मितीचा प्रवास आता सुरू झाला आहे. रिलायन्स कॅपिटलचे व्यावसायिक मूल्य किमान २०,००० कोटी रुपये असेल, असं हिंदुजा पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
कर्मचाऱ्यांचं काय होणार?
आयआयएचएल आता आरकॅपच्या संपूर्ण व्यवसायाचा आढावा घेईल आणि त्यानुसार आवश्यक निधीच्या गुंतवणुकीचा निर्णय घेईल, असं हिंदुजा म्हणाले. आरकॅपच्या उपकंपन्यांबाबत सांगताना, त्यांच्याकडे सुमारे ३९-४० युनिट्स आहेत आणि नवीन व्यवस्थापन त्यापैकी बर्याच युनिट्सची विक्री करेल कारण त्या बहुतेक लहान व्यवसाय असलेल्या छोट्या कंपन्या आहेत. त्याचवेळी वित्तीय सेवा कंपनी आरकॅपमध्ये काम करणाऱ्या १ लाख २८ हजार कर्मचाऱ्यांच्या हिताचे शक्य तितके संरक्षण केले जाईल, असं आश्वासन हिंदुजा यांनी दिलं.
या अधिग्रहणामुळे आयआयएचएलआपल्या बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा पोर्टफोलिओचा विस्तार करू इच्छित आहे. आयआयएचएल एप्रिल २०२३ मध्ये कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रियेअंतर्गत ९,६५० कोटी रुपयांच्या बोलीसह यशस्वी अर्जदार ठरली होती. या वर्षाच्या सुरुवातीला आयआयएचएलनं आरबीआय, आयआरडीए आणि संबंधित स्टॉक अँड कमॉडिटी एक्स्चेंजकडून सर्व आवश्यक मंजुरी मिळवली होती.