Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तरुण पिढीला माेठी संधी; आकाश, ईशा, अनंत अंबानी संचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 07:12 IST

नीता अंबानी यांना बोर्डाच्या बाहेर ठेवले असले तरी त्या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. 

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात मोठ्या बदलांची घोषणा सोमवारी करण्यात आली. पुढच्या पिढीतील आकाश, अनंत आणि ईशा अंबानी यांना संचालक मंडळात नवीन जबाबदारी दिली आहे. या तिघांच्या बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीला संचालक मंडळाने मान्यता दिली. नीता अंबानी यांना बोर्डाच्या बाहेर ठेवले असले तरी त्या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. 

कंपनीच्या ४६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याची माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी आकाश यांना रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष बनविले होते. मुकेश अंबानी अजूनही जिओचे चेअरमन आणि रिलायन्स जिओचे मालक आहेत. ईशा या रिलायन्स रिटेलच्या चेअरपर्सन आहेत व अनंत हे एनर्जी बिझनेस सांभाळत आहेत. 

जिओ एअर फायबरचे गणेश चतुर्थीला हाेणार लाॅंचिंगगणेश चतुर्थीला म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी जिओ एअर फायबर लॉन्च होणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. जिओ एअर फायबरद्वारे आम्ही २० कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. यातून दररोज १.५ लाख नवे ग्राहक जोडले जाऊ शकतील, असे ते म्हणाले.   

सर्वाधिक कर भरण्याचा विक्रम रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी सरकारला कर भरण्याच्या बाबतीतही अग्रस्थानी आहे. कंपनीने १६,००० कोटींहून अधिक कर भरून नवा विक्रम केला आहे. मुकेश अंबानी यांनी सांगितले की, कंपनीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात १६,६३९ कोटी रुपयांचा थेट कर भरला आहे. 

टॅग्स :रिलायन्सआकाश अंबानीईशा अंबानी