Join us

Recession In India: भारतातही मंदी येणार? मुडीजचा महत्वाचा अहवाल, तीन गोष्टी तारू शकतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 18:42 IST

Recession In India: ब्रिटनमध्ये मंदी जाहीर करण्यात आली आहे. तिथे मोठ्याप्रमाणावर करवाढ करण्यात आली आहे. अमेरिकेतही मंदीचे वारे दिसू लागले असून मोठमोठ्या कंपन्यांनी १०-१० हजारांच्या आकड्याने कर्मचाऱ्यांना काढण्यास सुरुवात केली आहे.

ब्रिटनमध्ये मंदी जाहीर करण्यात आली आहे. तिथे मोठ्याप्रमाणावर करवाढ करण्यात आली आहे. अमेरिकेतही मंदीचे वारे दिसू लागले असून मोठमोठ्या कंपन्यांनी १०-१० हजारांच्या आकड्याने कर्मचाऱ्यांना काढण्यास सुरुवात केली आहे. या बहुतांश कंपन्या आयटी कंपन्या असल्याने भारतीयांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. भारतातही मंदीची लाट येईल का? या चिंतेत सर्वजन असताना मुडीजने महत्वाची अपडेट दिली आहे. 

येत्या वर्षभरात आशिया-पॅसिफिक (एपीएसी) क्षेत्रात मंदी येण्याची शक्यता नाही, असे मुडीजने म्हटले आहे. परंतू, उच्च व्याजदर आणि मंद जागतिक व्यापार वाढ यामुळे हे क्षेत्र निश्चितपणे प्रभावित होईल, असा अंदाज रेटिंग एजन्सी मुडीज अॅनालिटिक्सने लावला आहे. 'APAC Outlook: A Coming Downshift' या शिर्षकाच्या विश्लेषणात मुडीजने हे म्हटले आहे. भारत पुढील वर्षात कमी गतीच्याच म्हणजेच मंद वेगाच्या विकासाच्या मार्गाकडे जाणार आहे, जो दीर्घकालीन शक्यतांसाठी अनुरुप आहे. गुंतवणुकीचा प्रवाह आणि तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढल्यास या विकासाला गती मिळेल, असे मुडीजने म्हटले आहे. 

महागाई उच्च पातळीवर कायम राहिल्यास, रिझर्व्ह बँकेला (RBI) रेपो रेट 6 टक्क्यांच्या वर ठेवावा लागेल, याचा परिणाम GDP वाढीवर होणार असून ती मंदावेल, अशी शक्यता वर्तविली आहे. ऑगस्टमधील मुडीजच्या अंदाजानुसार 2022 मध्ये भारताचा विकास दर 8 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये तो आणखी घसरून ५ टक्क्यांवर येईल असे म्हटले होते. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये युरोप आणि उत्तर अमेरिकेतील मंदीमुळे आर्थिक वाढ मंदावण्याची भीती आहे, भारतासह APAC क्षेत्रातील प्रमुख अर्थव्यवस्था कोरोनाचे निर्बंध उशिराने उठविल्याने आता विस्तारत आहेत, असे मुडीजने म्हटले. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपैसा