Join us  

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला २ लाख कोटी रूपयांचा फटका बसण्याची शक्यता: RBI

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 6:46 PM

COVID-19: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला २ लाख कोटी रूपयांचा फटका बसण्याची शक्यता असल्याचा RBI अंदाज.

ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला २ लाख कोटी रूपयांचा फटका बसण्याची शक्यता असल्याचा RBI अंदाज.रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्ध केला अहवाल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. तसंच दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी घातलेल्या निर्बंधांचा फटका अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. दरम्यान दुसऱ्या लाटेमुळे चालू आर्थिक वर्षादरम्यान उत्पादनात २ लाख कोटी रूपयांचं नुकसान होऊ शकतं असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) वर्तवला आहे.आर्थिक उत्पादानाच्या नुकसानीचा जीडीपी सोबत थेट संबंध असणार नाही, परंतु अर्थव्यवस्थेत पण अर्थव्यवस्थेतील मूल्यवर्धित तोट्याकडे तो निर्देशित करतो, असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे.

यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं आपल्या मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये जीडीपीचा अंदाज कमी केला होता. तसंच सुरू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा दर ९.५ टक्के केला होता. यापूर्वी जीडीपी वाढीचा दर हा १०.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पहिल्या तिमाहित जीडीपी १८.५ टक्क्यांच्या दरानं वाढेल या तथ्यावर प्रोजेक्शनचा अंदाज बांधण्यात आल्याचं रिझर्व बँकेच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

लोकांच्या खात्यातील पैसे घटले"कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लोकांच्या बँकेतील जमा रक्कम आणि हाती असलेल्या रोख रकमेवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. यावरून महासाथीदरम्यान लोकांनी उपचारांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केल्याचं दिसून येत आहे, एप्रिल २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणात ही रक्कम कमी झाली आणि ती १.७ टक्के राहिली. वर्षभरापूर्वी याच महिन्यात त्यात ३.५ टक्क्यांची वाढ झाली होती. याचा अर्थ कोरोना महासाथीदरम्यान उपचारांवर लोकांचा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला आहे," असं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटलं आहे. 

अर्थ मंत्रालयानुसार हर्ड इम्युनिटी बनण्यासाठी आणि रिकव्हरी मोमेंटम प्राप्त करण्यासाठी सप्टेंबर २०२१ पर्यंत ७० कोटी नागरिकांच्या लसीकरणाचं ध्येय ठेवण्यात आलं आहे, असं रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम.डी.पात्रा यांच्या उपस्थितीत तयार केलेल्या अहवालात सांगण्यात आलं आहे. यासाठी तब्बल ११३ कोटी डोसेसची आवश्यकता आहे आणि हे ध्येय गाठण्यासाठी दररोज ९३ लाख नागरिकांचं लसीकरण होणं आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

दुसऱ्या लाटेचा सामनाभारतीय अर्थव्यवस्था आताही महासाथीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. परंतु आता हळूहळू पूर्वपदावर येण्याची अपेक्षादेखील आहे. दरम्यान अहवालात हे लेखकांचे विचार असून ते रिझर्व्ह बँकेचे विचारही दर्शवतात असं आवश्यक नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या पुरवठ्याशी निगडीत अनेक पैलू पूर्वीच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहेत. यामध्ये कृषी आणि डिजिटल सेवांचाही समावेश आहे. हे आता यापूर्वीप्रमाणेच काम करत आहे. तर औद्योगिक उत्पादन आणि निर्यातही वाढली आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकभारतकोरोना वायरस बातम्यापैसा