Join us

आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बॅंकेचा लायसन्स केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:19 IST

RBI On Satara Bank: पाहा कोणती आहे ही सहकारी बँक आणि रिझर्व्ह बँकेनं का उचललं मोठं पाऊल. जाणून घ्या आता ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

RBI On Satara Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मंगळवारी सातारा येथील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. सहकारी बँकेकडे पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाच्या संधी नसल्यानं RBI नं हे कठोर पाऊल उचललं. सहकारी बँकेचा बँकिंग परवाना यापूर्वी ३० जून २०१६ रोजीच्या आदेशाद्वारे रद्द करण्यात आला होता आणि बँकेच्या अपीलावर २३ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांना पुन्हा परवानगी देण्यात आली. दरम्यान, अपीलीय अधिकाऱ्यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी २०१३-१४ आर्थिक वर्षासाठी बँकेचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत, असं RBI नं एका निवेदनात म्हटलंय.

ऑडिट पूर्ण झालं नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) एका फॉरेन्सिक ऑडिटरची (Forensic Auditor) नियुक्ती केली होती, पण बँकेच्या असहकार्यामुळे ते ऑडिट पूर्ण होऊ शकलं नाही. रिझर्व्ह बँकेनं परवाना रद्द करताना म्हटलं की, "आकलनानुसार बँकेची आर्थिक स्थितीसतत खालावत चालली आहे." या बँकेने ७ ऑक्टोबर, २०२५ रोजी कामकाजाची वेळ संपल्यानंतर बँकिंग व्यवसाय बंद केला आहे. महाराष्ट्राच्या सहकारी संस्थांच्या निबंधकांकडे (Registrar of Cooperative Societies) बँक बंद करण्याची आणि बँकेसाठी एक लिक्विडेटर नियुक्त करण्याची देखील विनंती करण्यात आली आहे.

पैसे जमा किंवा काढता येणार नाहीत

"परवाना रद्द झाल्यामुळे, जीजामाता महिला सहकारी बँक, सातारा, महाराष्ट्र यांना तत्काळ प्रभावाने 'बँकिंग' व्यवसाय करण्यास प्रतिबंधित करण्यात आलं आहे. यात, इतर गोष्टींबरोबरच, ठेवी स्वीकारणं आणि ठेवींची परतफेड करणं यांचा समावेश आहे," असं आरबीआयनं सांगितलं.

लिक्विडेशन झाल्यास, प्रत्येक ठेवीदार ठेव विमा आणि डीआयसीजीसीकडू (DICGC) त्यांच्या ठेवीवर ५ लाख रुपयांपर्यंत जमा विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र असेल.

विद्यमान ग्राहकांना पूर्ण पैसे देण्यास बँक असमर्थ

रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं की, ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत एकूण ठेवींपैकी ९४.४१ टक्के ठेवी DICGC विम्याअंतर्गत समाविष्ट होत्या. सहकारी बँकेकडे पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाची शक्यता नसल्यामुळे परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं रिझर्व्ह बँकेनं नमूद केलं."बँकेची आर्थिक स्थिती पाहता, बँक आपल्या विद्यमान ठेवीदारांना पूर्ण पैसे देण्यास असमर्थ असेल. जर बँकेला आपला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली, तर याचा जनतेच्या हितावर प्रतिकूल परिणाम होईल," असंही आरबीआयनं स्पष्ट केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : RBI Cancels License of Maharashtra's Jijamata Bank; Transactions Restricted

Web Summary : RBI revoked Jijamata Mahila Sahakari Bank's license due to insufficient capital and poor financial condition. Depositors face restrictions on withdrawals. Most deposits are insured up to ₹5 lakh. The bank is unable to repay depositors fully.
टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकमहाराष्ट्रबँक