indusind bank : गेल्या आठवड्यात खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेतून एक बातमी समोर आली. यानंतर पत्त्यांचा बंगला कोसळावा याप्रमाणे बँकेचे शेअर्स तब्बल २७ टक्के घसरले. डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमधील तफावतींमुळे गुंतवणूकदारांमध्ये भितीचे वातावरण पसरले. यातून पॅनिक विक्री झाल्याने बँकेचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खाली आहे. यानंतर बँकेतील सामान्य खातेधारकांचे पैसे बुडणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. आता आरबीआयने यावर स्पष्टीकरण दिल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असून बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत, बँकेचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर १६.४६% आणि तरतूद कव्हरेज प्रमाण ७०.२०% नोंदवले गेले. याव्यतिरिक्त, ९ मार्च २०२५ पर्यंत बँकेचे तरलता कव्हरेज रेशो (LCR) ११३% होते, जे १००% च्या नियामक आवश्यकतेपेक्षा जास्त आहे.
अफवांवर लक्ष देऊ नका : आरबीआयइंडसइंड बँकेबाबत वावड्या उठवल्या जात असून त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन मध्यवर्ती बँकेने ग्राहकांना केलं आहे. बँकेची आर्थिक स्थिती स्थिर असून रिझर्व्ह बँक त्यावर बारीक लक्ष ठेवून असल्याचे आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. लोकांच्या मनातून बँकेबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी आरबीआयने हे स्पष्टीकरण आपल्या वेबसाइटवर अपलोड केलं आहे.
इंडसइंड बँकेचे ऑडिट होणारडेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये विसंगती आढळल्यानंतर बँक व्यवस्थापनाला जाग आली आहे. बँकेने सध्याच्या प्रणालीचा सर्वसमावेशक आढावा घेण्यासाठी आणि वास्तविक परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी बाह्य लेखापरीक्षण टीम नियुक्त केली असल्याची माहिती आरबीआयने दिली. मध्यवर्ती बँकेने इंडसइंड बँकेच्या संचालक मंडळाला आणि व्यवस्थापनाला या तिमाहीत (Q4FY25) सुधारात्मक कृती पूर्ण करण्याचे आणि सर्व संबंधित पक्षांना आवश्यक खुलासे करण्याचे निर्देश दिले आहेत.
डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये विसंगतीबँकेने स्वतःच डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये विसंगती आढळल्याचे सांगितले होते. ज्याचा डिसेंबर २०२४ पर्यंत बँकेच्या एकूण मालमत्तेवर २.३५% पर्यंत नकारात्मक परिणाम होऊ शकतो. डेरिव्हेटिव्ह्ज पोर्टफोलिओचा आढावा घेताना ही तफावत समोर आल्याचे बँकेने सांगितले.
डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये तफावत म्हणजे नेमकं काय?डेरिवेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये विसंगती म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेला परतावा आणि तुम्हाला मिळालेला प्रत्यक्ष परतावा यांच्यातील फरक. समजा, तुम्ही एका कंपनीच्या शेअर्सवर आधारित डेरिवेटिव्हमध्ये गुंतवणूक केली आहे. तुम्हाला वाटते की कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढेल. परंतु, कंपनीच्या शेअर्सची किंमत कमी झाली, तर तुम्हाला अपेक्षित असलेला परतावा मिळणार नाही. यालाच डेरिवेटिव्ह पोर्टफोलिओमधील विसंगती म्हणतात.