Join us  

एअर इंडियाची 'घरवापसी'; रतन टाटा म्हणाले, "Welcome back, Air India"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 5:22 PM

Ratan Tata Tweets "Welcome Back, Air India" After Tata Sons Wins Bid : एअर इंडियासाठी टाटा समूह (TATA Group) आणि स्पाईसजेटच्या (Spicejet) अजय सिंग यांनी बोली लावली होती. टाटा समुहाने यासाठी सर्वाधिक १८ हजार कोटी रूपयांची बोली लावली आणि जिंकली.

नवी दिल्ली : तब्बल ६८ वर्षांनंतर सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (Air India) पुन्हा टाटा समुहाच्या (TATA Group) ताब्यात गेली आहे. एअर इंडियासाठी सरकारने टाटा समुहाची निवड केली. एअर इंडियासाठी टाटा समूह (TATA Group) आणि स्पाईसजेटच्या (Spicejet) अजय सिंग यांनी बोली लावली होती. टाटा समुहाने यासाठी सर्वाधिक १८ हजार कोटी रूपयांची बोली लावली आणि जिंकली. (Ratan Tata Tweets "Welcome Back, Air India" After Tata Sons Wins Bid)

दरम्यान, यासंदर्भात रतन टाटा यांनी ट्विट केले आहे. "टाटा समूहाने एअर इंडियासाठी बोली जिंकली ही एक चांगली बातमी आहे. एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल, हे मान्य असले तरी, विमान उद्योगात टाटा समूहाच्या उपस्थितीला बाजारपेठेची एक मजबूत संधी मिळेल अशी आशा आहे", असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, "जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने एकेकाळी जगातील सर्वात प्रतिष्ठित विमान कंपन्यांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला होता. आधीच्या वर्षांमध्ये मिळालेली प्रतिमा आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची संधी टाटाला मिळेल. जेआरडी टाटा आज आमच्यामध्ये असते तर त्यांना खूप आनंद झाला असता", असे भावनिक ट्विट रतन टाटा यांनी केले आहे. तसेच, खाजगी क्षेत्रासाठी निवडक उद्योग उघडण्याच्या सरकारच्या अलीकडील धोरणाबद्दल आपण ओळखले पाहिजे आणि आभार मानले पाहिजेत असे सांगत एअर इंडियाचे रतन टाटा यांनी स्वागत केले आहे.

दरम्यान, १९३२ मध्ये टाटा ग्रुपने एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. टाटा एअरवेज या भारतातल्या पहिल्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीचे स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण झाले आणि एअर इंडिया असे याचे नामांतरण झाले. सध्याच्या घडीला एअर इंडिया कर्जबाजारी झाली असून या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तसेच मोदी सरकारने २०१७ मध्येच एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरू केला होता. पण त्यावेळी कंपनी खरेदी करण्यासाठी कोणतीच उत्सुकता दाखवली नाही. आता अनेक कंपन्या एअर इंडिया खरेदीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे.त्यासाठी टाटा कंपनीने देखील बोली लावली होती. आज टाटा समुहाने बोली जिंकली.

एअर इंडियावर कर्जकर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या एअर इंडियाला विक्रीसाठी सुरू करण्यात आलेली बोली प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. तसेच यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे  (Aviation Minister Jyotiraditya Scindia) यांनी यापूर्वी तारीख बदलली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सरकारने यापूर्वी २०१८ मध्ये एअर इंडियातील (Air India) ७६ टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली होती. परंतु त्यावेळी सरकारला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर सरकारने कंपनीच्या पूर्णपणे विक्रीचा निर्णय घेतला. 

अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच १५ सप्टेंबरपर्यंत दोन संभाव्य खरेदीदारांनी आपल्या निविदा (financial bids) दाखल केल्या होत्या. टाटा समुहाद्वारे (TATA Group) आपली होल्डिंग कंपनी आणि स्पाईसजेटचे चेअरमन अजय सिंह आणि अन्य काही जणांनी आपली बोली सादर केली होती. सरकारने एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली होती. परंतु कोरोना महासाथीमुळे यामध्ये विलंब होत गेला. एप्रिल २०२१ मध्ये सरकारने पुन्हा एकदा बोली प्रक्रिया सुरू केली. तसेच १५ सप्टेंबर ही यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. २०२० मध्ये टाटा समुहानंदेखील एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी उत्सुक असल्याचे पत्र दिले होते. 

२०१७ मध्येच प्रक्रियेला सुरूवातसरकारने २०१७ मध्येच एअर इंडियाच्या विक्रीचे प्रयत्न सुरू केले होते. परंतु त्यावेळी कंपन्यांनी त्यात फारसा सर दाखवला नव्हता. ऑक्टोबरमध्ये सरकारनं एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टच्या नियमांमध्ये ढील दिल्यानंतर काही कंपन्यांनी एअर इंडियाच्या खरेदीत रस दाखवला होता. नव्या नियमांअंतर्गत कर्जाच्या तरतुदीबाबत शिथिलता दाखवण्यात आली, जेणेकरून स्वामित्व असलेल्या कंपनीला पूर्णपणे कर्जाचा बोजा सहन करावा लागणार नाही. १९५३ मध्ये भारत सरकारनं ही कंपनी आपल्या अधिकार क्षेत्रात घेतली होती.

टॅग्स :टाटारतन टाटाएअर इंडिया