Join us

रतन टाटांच्या आवडत्या व्यक्तीचा 'या' कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:02 IST

जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती आणि का दिला त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा.

देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाची कंपनी टाटा केमिकल्समध्ये मोठा बदल झालाय. कंपनीचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यापुढे या पदावर राहणार नाहीत. त्यांच्या जागी कंपनीचे संचालक एस. पद्मनाभन यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रशेखरन हे टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे चेअरमन असून दिवंगत रतन टाटा यांचे निकटवर्तीय मानले जातात. रतन टाटा यांचं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झालं. रतन टाटांचा त्यांच्यावर खूप विश्वास होता. चंद्रशेखरन यांची २०१७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

एन. चंद्रशेखरन यांनी टाटा केमिकल्सच्या संचालक मंडळाला एक पत्र लिहिलंय. यात त्यांनी यापुढे टाटा केमिकल्सचं अध्यक्षपदी आपल्याला का राहायचं नाही, हे स्पष्ट केलंय. आता आपल्याला बरीच कामं करायची आहेत आणि यापुढेही करणार असल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळेच ते हे पद सोडत आहेत. चंद्रशेखरन यांचे टाटा केमिकल्समध्ये सुमारे ९ कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये ते कंपनीच्या संचालक मंडळात रुजू झाले.

काय सांगतो नियम?

नियमानुसार एखादी व्यक्ती २० कंपन्यांमध्ये संचालक होऊ शकते. या कंपन्यांमध्ये खासगी, सार्वजनिक, लिस्टेड आणि अनलिस्टेड अशा सर्व प्रकारच्या कंपन्यांचा समावेश आहे. टाटा मोटर्स आता दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागली जात आहे. अशा परिस्थितीत चंद्रशेखरन यांना त्या ऑटोमोबाईल कंपनीत अधिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अलीकडेच त्यांची रतन टाटा एंडोमेंट फाऊंडेशनच्या अध्यक्षपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. हे फाऊंडेशन टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये रतन टाटा यांच्या शेअर्सचा बेनिफिशिअरी आहे. या शेअर्सची किंमत २,७५० कोटी रुपये आहे.

या २० कंपन्यांपैकी कोणतीही व्यक्ती १० सार्वजनिक कंपन्यांच्या संचालक मंडळात सामील होऊ शकते. या १० कंपन्यांपैकी ७ लिस्टेड कंपन्यांमध्ये ते डायरेक्टर होऊ शकतात. टाटा केमिकल्सनं मोदन साहा यांची कंपनीच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती केली आहे. मोदन साहा हे टाटा सन्सचे स्ट्रॅटेजी हेड आहेत. चंद्रशेखरन १९८७ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये इंटर्न म्हणून रुजू झाले. २००७ मध्ये ते टीसीएसच्या संचालक मंडळात सामील झाले आणि त्यांना सीओओ बनवण्यात आलं. २००९ मध्ये ते टीसीएसचे सीईओ झाले.

टॅग्स :टाटारतन टाटा