Join us
Daily Top 2Weekly Top 5

मूर्ती लहान पण कीर्ती महान! 'या' तरूण उद्योजकाला मिळाली रतन टाटांची साथ,तुम्हालाही वाटेल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 19:10 IST

अर्जुनने दोन वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला होता. आता कंपनीचे वार्षिक उत्पन्न 6 कोटी इतके आहे.

मुंबईतील 18 वर्षीय उद्योजक अर्जुन देशपांडे याने  तरुणांसमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. अर्जुन हा 'जेनेरिक आधार' या कंपनीचा मालक आहे. अर्जुनने व्यवसाय करण्याचा निर्धार केल्यामुळे आज तो एक यशस्वी उद्योजक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. विशेष म्हणजे, उद्योगपती रतन टाटा यांनी 50 टक्के त्याच्या कंपनीची भागीदारी विकत घेतली आहे.  रतन टाटा गेल्या 3-4 महिन्यांपासून त्यांच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करीत होते. ही कंपनी बाजारात स्वस्त दरात किरकोळ दुकानदारांना औषधांची विक्री करते.याबाबत अर्जुनने सांगितले की, " रतन टाटा यांनी दोन दिवसांपूर्वी  50 टक्के हिस्सा घेतला आहे. 

लवकरच यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली जाईल." सुत्रांच्या माहितीनुसार रतन टाटा यांनी व्यक्तीगत पातळीवर ही गुंतवणूक केली असून टाटा समूहाशी त्याचा काही संबंध नाही. यापूर्वीही रतन टाटा यांनी ओला, पेटीएम, स्नॅपडील, क्युरीफिट, अर्बन लेडर, लेन्सकार्ट आणि लिब्रेट अशा बर्‍याच स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली  होती. अर्जुनने दोन वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला होता. आता कंपनीचे वार्षिक उत्पन्न  6 कोटी इतके आहे. ही कंपनी थेट उत्पादकांकडून जेनेरिक औषधे खरेदी करते आणि ती किरकोळ दरात दुकानदारांना विकली जातात. यामुळे घाऊक विक्रेत्याचे सुमारे 16 ते 20 टक्के मार्जिन वाचते. 

सध्या ही कंपनी मुंबई, पुणे, बंगळुरू आणि ओडिसामधील ३० रिटेलर कंपनीसह जोडली गेली आहे. यामध्ये फार्मासिस्ट, आयटी इंजिनीअर आणि मार्केटिंग प्रोफेशनल यांचाही समावेश आहे.

अर्जुनने सांगितले की, "एका वर्षाच्या आत आम्ही सर्वसामान्य आधारावर १,००० फ्रँचायजी मेडिकल स्टोअर उघडण्याची योजना आखली आहे. आमचा व्यवसाय महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीपर्यंत वाढविण्याचा देखील मानस आहे." 

टॅग्स :रतन टाटा