अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपू्र्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या दिवशी आता शेअर बाजारही बंद राहणार आहे. या दिवशी मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) कोणतेही व्यवहार होणार नाहीत. अयोध्येतील राम मंदिरात पार पडणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे २२ जानेवारीला शेअर बाजारात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्याऐवजी आज म्हणजेच शनिवार, २० जानेवारी रोजी शेअर बाजार उघडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, शनिवारी २० जानेवारीला फक्त दोन तास बाजार उघडण्याची योजना होती. मात्र, नव्या परिपत्रकानुसार शनिवारी दिवसभर शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार आहे.अनेक कारणांमुळे शनिवारचं कामकाज वेगळं असेल हे जाणून गुंतवणूकदारांना आनंद होईल, अशी प्रतिक्रिया जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स यांनी दिली.
Ram Mandir : २२ जानेवारीला शेअर बाजार राहणार बंद, आज पूर्ण दिवस होणार कामकाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 08:58 IST