Join us

Raksha Bandhan 2020: रक्षाबंधनाच्या सणाला भारतीयांचा दणका; चीनला बसला ‘इतक्या’ कोटींचा आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 23:02 IST

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सद्वारे १० जूनपासून सुरु असलेल्या या अभियानात रक्षाबंधनाच्या सणामध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलं होतं

नवी दिल्ली – सीमेवर सुरु असलेल्या भारत-चीन संघर्षात चीनला मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. या वर्षी रक्षाबंधनाच्या सणामध्ये चीनला ४ हजार कोटींच नुकसान सहन करावं लागलं आहे. भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं अभियान वेगाने सुरु असून देशभरात लोकांनीही त्याला साथ दिली आहे. लोकांच्या मदतीनं भारतीय बाजारपेठेत यंदा चिनी मालाला जबर धक्का दिला आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सद्वारे १० जूनपासून सुरु असलेल्या या अभियानात रक्षाबंधनाच्या सणामध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, त्याला यश मिळालेलं दिसत आहे. यावेळी राखी बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारे चीनमधून सामान आयात केले नाही. देशभरातील महिलांनी आणि विविध संघटनांनी पुढाकार घेऊन १ कोटींहून अधिक राख्या विविध डिजाईनमध्ये तयार केल्या. विक्रेत्यांनीही भारतीय निर्मात्यांनी बनवलेल्या राख्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली.

फेडरेशनचे अध्यक्ष बी.सी भरतिया आणि प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, देशभरात दरवर्षी ५० कोटी राख्यांचा व्यापार होतो, ज्याची किंमत ६ हजार कोटींपर्यंत जाते. गेल्या अनेक वर्षापासून चीनमधून राख्यांचा सामान आयात केले जायचे, याची आर्थिक उलाढाल ४ हजार कोटींपर्यंत असे, यंदा चीनमधून कोणताही माल आयात करण्यात आला नाही असं त्यांनी सांगितले. चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्याच्या पुढील कार्यक्रमाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, ९ ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलनच्या दिवशी देशभरातील व्यापारी या दिवशी "चीन भारत छोडो" अभियान सुरू करतील आणि या दिवशी देशभरातील ८०० हून अधिक ठिकाणी व्यापारी संस्था शहरातील प्रमुख ठिकाणी जमा होऊन चीनविरोधात भारत छोडो आंदोलन पुकारतील.

टॅग्स :रक्षाबंधनभारतचीन