Join us  

रिस्क है, तो इश्क है! राकेश झुनझुनवालांची ‘अकासा एअर’ घेईल का उंच भरारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 6:16 AM

विमान कंपन्या तोट्यात असतानाही केली कोट्यवधींची गुंतवणूक

ठळक मुद्देआजमितीला सेवा देणाऱ्या विमान कंपन्या जबरदस्त तोट्यात आहेत.बदलत्या जीवनपद्धतीप्रमाणे विमान प्रवासाची मागणी उत्तरोत्तर वाढत आहे. झुनझुनवाला यांची रणनीती ही दीर्घकालीन आहे. कोरोना पश्चात हे क्षेत्र उभारी घेईल यात शंका नाही.

सुहास शेलार

मुंबई : रिस्क है, तो इश्क है! समभाग बाजारात (शेअर मार्केट) गुंतवणूक करून श्रीमंत होऊ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातले वाक्य. पण, शेअर मार्केट कोळून प्यायलेल्या एखाद्याने अशी रिस्क घेतली तर? कोरोनामुळे एकीकडे हवाई वाहतूक क्षेत्र तोट्यात असताना नवीन विमान कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेऊन राकेश झुनझुनवाला यांनी ती जोखीम पत्करली आहे. त्यामुळे या संकटकाळात त्यांची ‘अकासा एअर’ही कंपनी उंच भरारी घेईल का, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

समभाग बाजारातील सर्वांत मोठे गुंतवणूकदार (३४ हजार ३८७ कोटी) म्हणून राकेश झुनझुनवाला ओळखले जातात. त्यांनी आता हवाई वाहतूक क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते ३.५ कोटी डॉलरची गुंतवणूक करणार असून, नव्या विमान कंपनीचे नाव ‘अकासा एअर’ असेल. किफायतशीर सेवा (बजेट एअरलाइन) देणारी ही  कंपनी ७० नवी विमाने खरेदी करणार असून, त्यातील ४० टक्के हिस्सा विकत घेण्याचा झुनझुनवाला यांचा विचार आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) येत्या १५ दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

परंतु, कोरोनामुळे हवाई वाहतूक क्षेत्राचे चाक खोलात असताना नवी विमानसेवा सुरू करण्यात मोठी जोखीम असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. २०२० पासून विमान प्रवाशांच्या संख्येत ६५ ते ७० टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील बंदी १६ महिन्यांपासून कायम आहे. इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. प्रवासी वहन क्षमता मर्यादित करण्यात आली आहे. त्यात तिसऱ्या लाटेची चर्चा असताना नवीन विमान कंपनी सुरू करणे न समजण्यापलीकडे असल्याचे निवृत्त विमानतळ अधिकारी कैलास शर्मा यांनी सांगितले.

रणनीती काय असू शकते?

  • बदलत्या जीवनपद्धतीप्रमाणे विमान प्रवासाची मागणी उत्तरोत्तर वाढत आहे. भारतात हवाई वाहतूक क्षेत्राला सर्वाधिक वाव असल्याचे जागतिक संघटनांचे मत आहे. त्यामुळेच तर ‘कालरॉक - जालान’ यांनी तोट्यात गेलेल्या जेट एअरवेजच्या खरेदीचा निर्णय घेतला. अनेक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. 
  • झुनझुनवाला यांची रणनीती ही दीर्घकालीन आहे. कोरोना पश्चात हे क्षेत्र उभारी घेईल यात शंका नाही. पण सद्य:स्थितीचा फायदा घेऊन सर्व परवानग्या विना अडथळा मिळवायच्या, स्वस्तात मनुष्यबळ जमवायचे, मोठ्या विमानतळांवर उपलब्ध स्लॉट तत्काळ आरक्षित करून ठेवायचे, असा विचार यामागे असू शकतो.
  • आजमितीला सेवा देणाऱ्या विमान कंपन्या जबरदस्त तोट्यात आहेत. त्यामुळे येत्या काळात सवलती किंवा किफायतशीर दरात सेवा देणे त्यांना परवडणारे नाही. या संधीचा फायदा घेत बजेट एअरलाइन सुरू करून या क्षेत्रात पाय घट्ट रोवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो, अशी माहिती एका विमान कंपनीशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
टॅग्स :शेअर बाजारविमान