Pulse Candy Success: अवघ्या १ रुपयात मिळणारा पल्स कँडी (Pulse Candy) नऊ वर्षांत मोठा ब्रँड बनला आहे. हा ब्रँड आता शेकडो कोटी रुपयांचा झालाय. आपला पल्स कँडी ब्रँड येत्या दोन वर्षांत १००० कोटींचा टप्पा पार करेल, असं धर्मपाल सत्यपाल ग्रुपचे (डीएस ग्रुप) उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये पल्स कँडीनं ७५० कोटी रुपयांची कमाई केली, तेव्हा ते बोलत होते.
७५० कोटींच्या कँडीची विक्री
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२४-२५ या वर्षात कंपनीनं ७५० कोटी रुपयांच्या पल्स कँडीची विक्री केली आहे. सध्या भारतात हार्ड बॉईल्ड कँडीची बाजारपेठ अंदाजे ४,००० कोटी रुपये आहे. हार्ड बॉईल्ड कँडी म्हणजे तोंडात ठेवून हळूहळू विरघळणारी कँडी.
काही नवे प्रोडक्टही
या कँडीच्या प्रचंड यशानंतर, डीएस ग्रुप आता पल्स कँडीची नवीन उत्पादनं आणण्याची योजना आखत आहे. ते विविध प्रकारची कँडी आणि स्थानिक फ्लेवर्सवाल्या कँडी आणतील. राजीव कुमार म्हणतात की त्यांना पल्स कँडी हा भारतातील एक मोठा कँडी ब्रँड बनवायचा आहे. "आम्ही देशातील कडक उकडलेल्या कँडीमध्ये सर्वात मोठे खेळाडू आहोत. आमचा बाजार हिस्सा १९ टक्के आहे. गेल्या तीन वर्षांत, आम्ही १५ टक्के दरानं वाढत आहोत. तर हार्ड बॉईल्ड कँडीची बाजारपेठ ९ टक्के दरानं वाढत आहे," अशी प्रतिक्रिया कुमार यांनी दिली.
१००० कोटींचा ब्रँड
ब्रँडच्या वाढीबद्दल बोलताना राजीव कुमार म्हणाले पल्स कँडी "लवकरच, दीड ते दोन वर्षांत १००० कोटी रुपयांचा टप्पा गाठेल. आम्ही १५ टक्के दराने वाढ करत आहोत आणि या वेगाने आम्ही लवकरच १००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो," असं ते म्हणाले.
IIMA मध्ये केस स्टडी
डीएस ग्रुपनं २०१५ मध्ये पल्स कँडी बाजारात आणली. कंपनीचं म्हणणं आहे की पल्स कँडी लाँच झाल्यापासून नऊ वर्षांपासून हार्ड बॉईल्ड कँडीमध्ये आघाडीवर आहे. त्याच्या यशानं प्रभावित होऊन, आयआयएम अहमदाबादनं (इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद) गेल्या वर्षी त्यांच्या अभ्यासक्रमात केस स्टडी म्हणून त्यांचा समावेश केला आहे.