Join us

Real Estate Investment : घर, ऑफिस की गोदाम, कोणत्या मालमत्तेत सर्वाधिक पैसे गुंतवले जातात? वाचून विश्वास नाही बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:57 IST

Real Estate Investment : रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्थात्मक गुंतवणूक या वर्षी ५१ टक्क्यांनी वाढून विक्रमी ८.८७ अब्ज डॉलर झाली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या मालमत्ता वर्गात पैसे गुंतवले आहेत.

Real Estate Investment : भारतीयांचा अजूनही प्रॉपर्टीमध्येच जीव गुंतलेला आहे. कारण, मालमत्तेतील गुंतवणूक अनेकदा भावनेशीही जोडलेली असते. माझं हक्काचं घर, शेत, जमीन असं आपण नेहमीच म्हणतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्थावर मालमत्ता हा गुंतवणुकीतील सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. पण, चांगला परतावा मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मालमत्तेत गुंतवणूक करावी? असा प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच आला असेल. याचं उत्तर तुम्हाला या रिपोर्टमध्ये मिळणार आहे. भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्थात्मक गुंतवणूक या वर्षी ५१ टक्क्यांनी वाढून विक्रमी८.८७ अब्ज डॉलर्स झाली आहे. यावरुन याचं महत्त्व अधोरेखित होते.

एका अहवालानुसार, गुंतवणूकदारांना निवासी, कार्यालय आणि गोदाम मालमत्तांच्या मजबूत मागणीचा फायदा उचलायचा आहे. त्यामुळे ही वाढ झाली. २०२४ मध्ये भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्थात्मक गुंतवणुकीचा एकूण आकडा ८.८७ अब्ज डॉलर्स असेल, तर २०२३ च्या कॅलेंडर वर्षात तो ५.८७ अब्ज डॉलर्स होता. भारतीय रिअल इस्टेटमधील एकूण संस्थात्मक गुंतवणुकीत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ६३ टक्के योगदान दिले आहे.

विविध मालमत्ता वर्गांबद्दल बोलायचे तर, गृहनिर्माण क्षेत्रात ४५ टक्के गुंतवणूक झाली आहे. यानंतर, कार्यालयीन इमारतींमध्ये २८ टक्के आणि वेअरहाउसिंग (स्टोरेज) मालमत्तांमध्ये २३ टक्के गुंतवणूक झाली. अहवालानुसार, “वर्ष २०२४ मध्ये, ७८ व्यवहारांमधून संस्थात्मक गुंतवणूक ८.९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल. हा आकडा आजपर्यंतचा उच्चांक आहे. यापूर्वीचा सर्वोच्च आकडा २००७ मध्ये गाठला गेला होता. त्यावेळी ते ८.४ अब्ज डॉलर होते.

प्रॉपर्टी डीलमध्ये ४७ टक्के वाढवेगवेगळ्या मालमत्ता व्यवहारांमध्ये २०२४ मध्ये ४७ टक्के वाढ झाली आहे. जेएलएलच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक आणि भांडवली बाजार प्रमुख लता पिल्लई, म्हणाल्या, “मजबूत वाढ, राजकीय स्थिरता आणि विविध गुंतवणुकीच्या संधी जागतिक आर्थिक संदर्भात भारताला अनुकूल स्थितीत ठेवतात. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात संस्थात्मक गुंतवणुकीत वाढ झाली आहे. त्या म्हणाल्या की, २०२३ पासून देशांतर्गत गुंतवणूकदारांचा सहभाग वाढत आहे. हा कल २०२४ मध्येही कायम राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये त्यांचे योगदान ३७ टक्के असेल. तर २०१९-२०२२ मध्ये त्यांचे योगदान सरासरी १९ टक्के आहे. 

टॅग्स :गुंतवणूकपैसापरकीय गुंतवणूक