Join us

खासगी कंपन्या २ वर्षांत देणार २४ लाख नोकऱ्या; क्विक कॉमर्स क्षेत्रात ५ लाख कामगारांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:58 IST

‘इनडीड’ या प्लॅटफॉर्मने केलेल्या पाहणीतून समोर आली आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क , नवी दिल्ली: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अनेक शहरांमध्ये वाढलेला विस्तार यामुळे देशातील विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज निर्माण होणार आहे. त्यामुळे २०२७ पर्यंत कंपन्यांमध्ये तब्बल २४.३ लाख जणांना नोकऱ्या मिळणार आहेत, असे ‘इनडीड’ या प्लॅटफॉर्मने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. केवळ क्विक कॉमर्स क्षेत्रातील ५ लाख कर्मचाऱ्यांची गरज भासणार असल्याने तरुणांना चांगल्या संधी मिळू शकणार आहेत.

‘इनडीड’ इंडियाचे विक्री प्रमुख शशी कुमार म्हणाले की, सध्या देशात असलेला क्विक कॉमर्स उद्योग वेगाने प्रगती करत आहे. या मागणीला पूरक म्हणून कुशल तसेच अकुशल कामगारांच्या भरतीत महत्त्वपूर्ण बदल झालेले दिसून येत आहेत. सणासुदीच्या काळात वाढलेल्या खरेदीमुळे ई-कॉमर्स कंपन्यांनी मागील तिमाहीत ४० हजारहून अधिक जणांना रोजगार दिले आहेत. 

कोणत्या कौशल्यांना सर्वाधिक मागणी?

ऑटोमेशन आणि डिजिटल साधनांचा वापर वाढल्याने कामगारांनी नवी कौशल्ये आत्मसात करुन घेण्यावर भर दिला आहे. विविध कंपन्यांमध्ये पाच कौशल्ये असलेल्या कामगारांची सर्वाधिक मागणी आहे. त्यात नेव्हिगेशन आणि ड्रायव्हिंग, डिजिटल शिक्षण, डेटा विश्लेषण, व्यवस्थापन, तांत्रिक सहाय्य या क्षेत्रांचा समावेश आहे. तंत्रज्ञान-आधारित कंपन्यांनी कामगारांची कार्यक्षमता वाढवण्यावर प्रामुख्याने भर दिला आहे. 

देशातील प्रमुख शहरांत भरतीमध्ये वाढ

दिल्ली, चेन्नई, पुणे, बंगळुरू आणि मुंबई यांसारख्या देशातील प्रमुख शहरांमध्ये क्विक कॉमर्सच्या झपाट्याने वाढीमुळे कामगारांच्या भरतीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. चंडीगड आणि अहमदाबाद यांसारख्या टियर-२ शहरांमध्येही रोजगाराच्या संधी वाढत आहेत.

महिन्याचे सरासरी वेतन किती?

डिलिव्हरी ड्रायव्हर आणि किरकोळ कामगारांसह विविध कंपन्यांमध्ये कुशल तसेच अकुशल काममगारांना मासिक सरासरी २२,६०० रुपये इतके वेतन दिले जात आहे. अधिक काम असलेल्या कालखंडात कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन किंवा बोनस दिला जात आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी स्मार्टफोन देण्यासह रेफरल रिवॉर्ड व इतर योजनाही राबवित आहेत.

टॅग्स :नोकरीकर्मचारीबेरोजगारी