पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, या दिवाळीत सरकार देशवासियांना 'दिवाळी भेट' देणार असल्याची घोषणा केली. "आम्ही राज्यांशी चर्चा केली आहे आणि दिवाळीपर्यंत जीएसटीमध्ये सुधारणा आणू, जी नागरिकांसाठी दिवाळी भेट असेल. सामान्य माणसाने वापरलेल्या वस्तूंवरील कर लक्षणीयरीत्या कमी केले जातील. याचा फायदा एमएसएमईंनाही होईल आणि दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत होईल," असं मोदी म्हणाले होते. पंतप्रधानांनी जीएसटी दर कमी करण्याचे संकेत दिल्यानं, आता सर्वांना या दिवाळीत कोणत्या गोष्टी स्वस्त होतील हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.
पीटीआयनं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकार सध्याचे १२% आणि २८% जीएसटी स्लॅब रद्द करू शकते आणि फक्त ५% आणि १८% जीएसटी स्लॅब ठेवू शकते. २८% कर स्लॅबमध्ये येणाऱ्या ९०% वस्तूंवरील कर १८% पर्यंत कमी करण्याची योजना आहे आणि १२% स्लॅबमध्ये समाविष्ट असलेल्या वस्तू ५% स्लॅबमध्ये आणण्याचा विचार आहे. याशिवाय, सरकार ४०% चा नवीन स्लॅब देखील आणू शकते, ज्यामध्ये तंबाखू, पान मसाला आणि इतर लक्झरी वस्तूंचा समावेश असेल.
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
कोणत्या वस्तू स्वस्त होऊ शकतात?
जर १८% स्लॅबमध्ये समाविष्ट असलेल्या वस्तू ५% स्लॅबमध्ये आणल्या तर सामान्य माणसाला सर्वात जास्त फायदा होईल. कारण सध्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवर फक्त १८% जीएसटी आकारला जात आहे. याशिवाय, सामान्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तूंचाही १२% स्लॅबमध्ये समावेश आहे. अशा परिस्थितीत, जर १२% कर स्लॅब रद्द करून त्यात समाविष्ट असलेल्या वस्तूंवरील जीएसटी ५% केला तर ते सामान्यांसाठी एक मोठी भेट असेल.
सध्या १२% जीएसटी स्लॅबमध्ये नमकीन, भुजिया आणि इतर स्नॅक्स, ज्यूस, बदाम, अक्रोड, काजू, लोणी, तूप आणि चीज तसंच ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे शूज, चप्पल आणि सँडल, १००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या साड्या, सूट आणि कुर्ता या सारखे कपडे, मोबाईल फोन, चार्जर, कम्प्युटर आणि लॅपटॉप, पॅकेज्ड आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथिक औषधं, कॉन्टॅक्ट लेन्स आणि चष्मा, केसांचं तेल, साबण, टूथपेस्ट आणि शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहे. जर यावरील जीएसटी १२ वरून ५% पर्यंत कमी केला तर त्यांच्या किमती कमी होतील.
बिस्किट-नूडल्स ते फ्रिज-गीझर यांच्या स्वस्त होऊ शकतात
१८% जीएसटी दर हा मध्यम-उच्च स्लॅब आहे, जो अनेक दैनंदिन वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि विविध सेवांवर लागू होतो. या स्लॅबमध्ये अशी उत्पादनं आणि सेवांचा समावेश आहे ज्या अत्यंत आवश्यक नाहीत किंवा संपूर्ण लक्झरीच्या श्रेणीत येत नाहीत. बिस्किटे, केक, पेस्ट्री आणि इतर बेकरी उत्पादनं (पॅकेज्ड आणि ब्रँडेड), ब्रँडेड कॉर्नफ्लेक्स, पास्ता, मॅकरोनी, नूडल्स, ३२ इंचांपर्यंतचे एलसीडी/एलईडी टीव्ही, कॅमेरा, स्पीकर, हेडफोन, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, हीटर, कॉफी मेकर, सौंदर्यप्रसाधनं, शॅम्पू, केसांचे रंग, १००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तयार कपडे, ५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीची पादत्राणं, अॅल्युमिनियमचे दरवाजे, खिडक्या, तारा आणि केबल्स आणि काचेच्या उत्पादनांसारख्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवर १८% जीएसटी लागू आहे. दिवाळीपर्यंत ही उत्पादने स्वस्त होण्याची शक्यता आहे कारण सरकार त्यांच्यावरचा जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे.