Join us

महाग पेट्रोल-डिझेलमुळे लोक घेत होते CNG कार, आता काय करणार?; २० रुपये किलोपर्यंत वाढले दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 23:35 IST

CNG Price Hike: सीएनजीच्या किंमती वाढल्यानं आता कार चालकांना पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुका असतानाही सीएनजीचे दर वाढत होते.

सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असल्यानं लोकांनी आपला मोर्चा सीएनजी कार्सकडे वळवला होता. सीएनजी कार्सच्या झालेल्या विक्रीवरून याचा अंदाज बांधता येऊ शकतो. प्रामुख्यानं मोठ्या शहरांकडील लोकांचा कल सीएनजी कार खरेदीकडे होता. 

परंतु आता सीएनजीच्याही वाढत्या किंमतीनं वाहन चालकांना विचार करायला भाग पाडलं आहे. सीएनजीच्या किंमतीही सातत्यानं वाढत आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांदरम्यान अनेक दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर होत्या, परंतु सीएनजीच्या किंमती मात्र वाढत होत्या

सीएनजीच्या किंमतीत वाढएकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत, तर दुसरीकडे सीएनजीच्याही किंमती वाढत आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये सीएनजीची किंमत पेट्रोल आणि डिझेलच्या दराप्रमाणेच वाढली आहे. ज्याप्रकारे सरकारनं नैसर्गिक वायूच्या किंमती दुप्पट केल्या, त्यावरून येत्या काळात सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुरूवारी सलग दुसऱ्या दिवशी सीएनजीच्या किंमतीत वाढ करण्यात आली. अडीच रुपयांची वाढ झाल्यानंतर दिल्लीत सीएनजीचे दर ६९.११ रुपये प्रति किलो झाले आहेत. तर दुसरीडे नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीचे दर ७१.६७ रुपये प्रति किलो झाले आहेत. तर मुंबईत सीएनजीचे दर ६७ रुपये प्रति किलो इतके झाले आहेत. यासोबतच गेल्या सहा दिवसांमध्ये यात ९ रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तर गेल्या ४ महिन्यांमध्ये सीएनजीच्या किंमतीत २० रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे. यादरम्यान, पेट्रोलच्या दरात १० रुपयांची वाढ झाली.

 

टॅग्स :कारभारतपेट्रोलडिझेल