private flyover : देशात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढतच चालली आहे. या उपाय म्हणून एका कंपनीने थेट स्वतःचाच खाजगी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळूरुमध्ये आता रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठी कंपनी प्रेस्टिज ग्रुपला १.५ किलोमीटरचा 'खाजगी' उड्डाणपूल बांधण्याची महापालिकेकडून मंजुरी मिळाली आहे. हा उड्डाणपूल बेलांदूरमधील त्यांच्या आगामी प्रेस्टिज बीटा टेक पार्कला शहराच्या आउटर रिंग रोडशी जोडणार आहे. यामुळे या भागात वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.
कसा असेल हा उड्डाणपूल?डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार, हा उड्डाणपूल संपूर्णपणे सार्वजनिक रस्त्यालगत आणि बहुतेक करियम्माना अग्रहारा रोडवरील स्टॉर्मवॉटर ड्रेनच्या शेजारी बांधला जाईल. या बदल्यात, प्रेस्टिज ग्रुप आपल्या संपूर्ण खर्चाने हा रस्ता रुंद करणार आहे. दरम्यान, प्रेस्टिज ग्रुपच्या प्रवक्त्याने यावर काहीही टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.
परवानगी मिळण्याची प्रक्रियाप्रेस्टिजने या उड्डाणपुलासाठी बीबीएमपीकडे दोनदा अर्ज केला होता - एकदा ऑगस्ट २०२२ मध्ये आणि पुन्हा नोव्हेंबर २०२३ मध्ये. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंजुरीनंतर एप्रिल २०२५ मध्ये ही परवानगी देण्यात आली.
या उड्डाणपुलाची गरज का?प्रेस्टिजचा हा नवीन टेक कॅम्पस ७० एकरमध्ये पसरलेला असून, यात ५,००० हून अधिक कर्मचारी काम करतील अशी अपेक्षा आहे. प्रेस्टिजने आपल्या प्रस्तावात जुना विमानतळ रस्ता (येमलूर मार्गे) आणि करियम्माना अग्रहारा रोडवर आधीच खूप वाहतूक कोंडी होत असल्याचे नमूद केले होते.
बंगळूरु स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे तांत्रिक संचालक बी. एस. प्रहल्लाद यांनी सांगितले की, "या नवीन रस्त्यामुळे साक्रा हॉस्पिटल रोडपर्यंतचे अंतर २.५ किलोमीटरने कमी होईल." अशा मंजुरींचा उद्देश शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारीला चालना देणे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या अटी काय आहेत?बीबीएमपीने या उड्डाणपुलाला परवानगी देताना काही अटी ठेवल्या आहेत.
- नवीन बांधलेला हा उड्डाणपूल सार्वजनिक वापरासाठी खुला असावा.
- रस्ता रुंदीकरणासाठी प्रेस्टिजने सोडलेल्या जमिनीच्या भरपाई म्हणून त्यांना हस्तांतरणीय विकास हक्क प्रमाणपत्रांचा दावा करण्याची परवानगी देण्यात आली आहे, जर ते कायदेशीर चौकटीत बसत असेल.
- प्रहल्लाद यांनी ४० फूट रस्ता रुंदीकरणाचा खर्च प्रेस्टिजने उचलण्याच्या अटीवर प्रकल्पाला मंजुरी दिली.
सार्वजनिक जमिनीवर खाजगी कंपन्यांकडून बांधकाम?बंगळूरुमध्ये सार्वजनिक जमिनीवर खाजगी कंपन्यांनी प्रकल्प बांधण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी:लुलू मॉलने सार्वजनिक रस्त्याचा एक भाग वापरून एक अंडरपास बांधला आहे.मान्यता एम्बेसी बिझनेस पार्कने आउटर रिंग रोडच्या उन्नत रस्त्याला थेट जोडण्यासाठी एक उड्डाणपूल बांधला आहे.
वाचा - वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
प्रेस्टिज व्यतिरिक्त, डीएच अहवालानुसार बागमाने ग्रुपने देखील दोड्डानेकुंडी येथील त्यांच्या कॅम्पसमध्ये ६०० मीटरचा उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. हे सर्व प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेला वेगळे वळण देत आहेत.