Join us

UPI पेमेंट्स आणि ई-कॉमर्समध्ये Adani एन्ट्रीच्या तयारी; Google, Paytm ला मिळणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:18 IST

Gautam Adani Group Ecommerce : गौतम अदानी समूह ई-कॉमर्स आणि फायनान्स क्षेत्रात व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहे. दरम्यान, अदानी समूह क्रेडिट कार्ड व्यवसायातही येण्याच्या तयारीत आहे. पाहा काय आहे समूहाची योजना.

Gautam Adani Group Ecommerce : गौतम अदानी समूह ई-कॉमर्स आणि फायनान्स क्षेत्रात व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहे. हा समूह केवळ युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (UPI) लायसन्ससाठी नाही तर, को-ब्रँडेड अदानी क्रेडिट कार्डसाठी बँकांशी चर्चादेखील करत आहे. मात्र, अदानी समूहानं या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. अदानी समूहाच्या या नव्या निर्णयामुळे गुगल आणि पेटीएमसारख्या स्पर्धकांच्या अडचणी वाढू शकतात. 

काय आहे प्लॅन? 

फायनान्शिअल टाईम्सच्या (FT) वृत्तानुसार, अदानी समूह ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सद्वारे (ONDC) ऑनलाइन शॉपिंग ऑफर करण्यासाठी बोलणी करत आहे. ओएनडीसी हे सरकार समर्थित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी विक्रेते आणि खरेदीदार म्हणजेच ग्राहक दोघेही एकमेकांना थेट भेटतात. या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करण्यासाठी पेमेंट अॅप असणं आवश्यक आहे.  

अदानी समूहाच्या नव्या प्रयत्नांना अंतिम स्वरूप मिळाल्यास अदानी वन या ग्राहक अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना ही सेवा उपलब्ध होणार आहे. हे अॅप २०२२ च्या अखेरीस लॉन्च करण्यात आलं होतं. फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगसारख्या ट्रॅव्हल सर्व्हिसेस या अॅपवर उपलब्ध आहेत. रिपोर्टनुसार, समूहाचे ई-कॉमर्स आणि पेमेंट प्लॅटफॉर्म सर्वात आधी त्यांच्या विद्यमान ग्राहकांना टार्गेट करणार आहेत. 

कोण आहेत स्पर्धक? 

या क्षेत्रात अदानी समूहाचे अनेक स्पर्धक असतील. उदाहरणार्थ, गुगल, फोनपे आधीच यूपीआय-आधारित पेमेंट अॅप्स चालवत आहेत, तर पेटीएम आणि टाटासारख्या देशांतर्गत कंपन्या ओएनडीसीच्या माध्यमातून किराणा आणि फॅशन शॉपिंगची ऑफर देत आहेत. 

काय म्हणतात तज्ज्ञ? 

"हा देश टाटा, अंबानी आणि अदानी हे तीनच समूह चालवतात. अदानी तीन गटांपैकी एक आहे, ज्यांच्याकडे कन्झ्युमर प्रोडक्टचा व्यवसाय नाही. अशा तऱ्हेनं या नव्या उपक्रमामुळे अदानी समूहासाठी नवी दारे खुली होणार आहेत," अशी प्रतिक्रिया बंगळुरू स्थित टेक एक्सपर्ट जयंत कोल्ला यांनी एफटीशी बोलताना दिली.

टॅग्स :गौतम अदानीअदानीगुगल पेपे-टीएम