India On Trump Tariff: अमेरिकेसोबतच्या टॅरिफमुळे संबंध बिघडत असताना, भारतानं एक मोठं पाऊल उचललं आहे. भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या पार्सल आणि टपाल सेवांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकन सरकारनं अलिकडेच घेतलेल्या एका मोठ्या निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं टपाल विभागानं म्हटलंय. या बंदीमुळे सामान्य लोक तसंच अमेरिकेतील ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांना तसंच ग्राहक किंवा व्यावसायिक भागीदारांना वस्तू पाठवणाऱ्या लहान व्यावसायिकांना अडचणी येऊ शकतात.
अमेरिकेचा निर्णय काय?
३० जुलै २०२५ रोजी, अमेरिकन प्रशासनाने एक कार्यकारी आदेश क्रमांक १४३२४ जारी केला. या अंतर्गत, अमेरिकेनं "ड्युटी-फ्री डी मिनिमिस एक्झम्पशन" रद्द करण्याची घोषणा केली आहे. पूर्वी, ८०० डॉलर्सपर्यंतच्या वस्तूंवर कोणतंही कस्टम ड्युटी नव्हती. परंतु ही सूट २९ ऑगस्ट २०२५ पासून संपणार आहे. किंमत कितीही असली तरी आता अमेरिकेत जाणाऱ्या प्रत्येक पार्सलवर कस्टम ड्युटी आकारली जाईल. दरम्यान, भेटवस्तूंच्या वस्तूंना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे. जर एखाद्यानं १०० डॉलर्सपर्यंतचं गिफ्ट पाठवलं असेल तर त्यावर कस्टम ड्युटी आकारली जाणार नाही.
टपाल सेवा का बंद करण्यात आली?
अमेरिकेच्या नवीन नियमानुसार, आता सर्व आंतरराष्ट्रीय पोस्टल शिपमेंटवर कस्टम ड्युटी वसूल करावी लागेल. ही जबाबदारी ट्रान्सपोर्ट कॅरिअर्स किंवा क्वालिफाईड पार्टीजना देण्यात आली आहे ज्यांना यूएस कस्टम्सद्वारे (CBP) मान्यता दिली जाईल. परंतु ही प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही.
CBP ने १५ ऑगस्ट २०२५ रोजी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, परंतु अनेक महत्त्वाच्या गोष्टी अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. उदाहरणार्थ - ड्युटी वसूल करण्याची पद्धत काय असेल, पैसे कोण जमा करेल आणि ते अमेरिकन सरकारला कसे पोहोचवले जातील. हेच कारण आहे की अमेरिकेत जाणाऱ्या एअर कॅरिअर्सनं २५ ऑगस्ट २०२५ पासून पार्सल आणि सामान वाहून नेण्यास नकार दिला आहे.
भारताचं पाऊल काय?
टपाल विभागानं स्पष्टपणे सांगितलंय की २५ ऑगस्ट २०२५ पासून अमेरिकेसाठी सर्व प्रकारच्या टपाल वस्तूंचे बुकिंग तात्पुरतं थांबवण्यात आले आहे. म्हणजेच, आता पार्सल किंवा मर्चंडाईज पाठवल्या जाणार नाहीत. दोन प्रकारच्या वस्तू अजूनही पाठवता येतील, ज्यात पत्रे किंवा कागदपत्रे आणि १०० डॉलर्सपर्यंतच्या भेटवस्तू अमेरिकेत पाठवण्याची परवानगी अजूनही राहील.
सर्वात जास्त समस्या कोणाला येतील?
या बंदीमुळे सामान्य लोकांवरही परिणाम होईल, परंतु सर्वात मोठा परिणाम लहान व्यावसायिक आणि निर्यातदारांवर होईल. भारतातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लहान पार्सल, ई-कॉमर्स उत्पादनं आणि भेटवस्तू पाठवल्या जातात. अशा परिस्थितीत, जोपर्यंत ही बंदी उठवली जात नाही तोपर्यंत व्यावसायिकांना अडचणींना तोंड द्यावं लागेल.
कधीपर्यंत असेल बंदी?
ही बंदी तात्पुरती आहे. टपाल विभागाचं म्हणणं आहे की ते अमेरिकन टपाल प्राधिकरण आणि कस्टम्सशी सतत संपर्कात आहे. नवीन प्रणाली लागू होताच आणि कॅरिअर्स तयार होताच, सेवा पुन्हा सुरू केली जाईल.