Join us

Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:04 IST

Post Office Old Service Stop: पोस्ट ऑफिसनं एक मोठी घोषणा केली आहे. त्या अंतर्गत पोस्टाची ५० वर्षे

Post Office Old Service Stop: पोस्ट ऑफिसनं एक मोठी घोषणा केली आहे, ज्याअंतर्गत ते आपली रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याची योजना आखत आहे. हा निर्णय १ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. भारतीय पोस्टाची रजिस्टर्ड पोस्ट सेवा ५० वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. ही सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीन करण्याचा विभागाचा विचार आहे.

पोस्टानं आपलं कामकाज जलद, ट्रॅक करण्यास सोपं आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. पोस्टानं सर्व सरकारी विभाग, न्यायालयं, विद्यापीठे आणि इतर संस्थांना १ सप्टेंबरपूर्वी त्यांच्या सेवा स्पीड पोस्टवर हस्तांतरित करण्याचे निर्देश दिलेत.

४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक

सामान्य जनतेवर काय परिणाम होईल?

पोस्टाच्या या विलीनीकरणानंतर, पोस्ट सेवा महाग होईल, ज्यामुळे सामान्य नागरिकांसाठी आणि विशेषतः शेतकरी, लहान व्यापारी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी पोस्टाच्या सेवेचा खर्च वाढेल, जे स्वस्त टपाल सेवांवर अवलंबून आहेत. स्पीड पोस्ट सेवेची किंमत ५० ग्रॅमपर्यंत ४१ रुपयांपासून सुरू होते, तर रजिस्टर्ड पोस्ट २४.९६ रुपये आणि त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त २० ग्रॅमसाठी ५ रुपये अशी आहे. ज्यामुळे ती स्पीड पोस्टपेक्षा २० ते २५% स्वस्त होते.

पोस्टाच्या मते, रजिस्टर्ड पोस्टाच्या मागणीत सतत घट होत आहे. डिजिटल सेवा, ई-मेल आणि खाजगी कुरिअर कंपन्यांच्या वाढत्या वापरामुळे लोक आता पारंपारिक टपाल सेवा कमी वापरत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, २०११-१२ मध्ये रजिस्टर्ड पोस्ट सेवा वापरून पाठवलेल्या पार्सलची संख्या २४.४४ कोटी होती, जी २०१९-२० पर्यंत कमी होऊन १८.४६ कोटी झाली. या घसरणीला पाहता, टपाल विभागानं रजिस्टर्ड पोस्ट स्पीड पोस्टमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतलाय.

स्पीड पोस्टद्वारे अनेक सुविधा

१ सप्टेंबर २०२५ पासून रजिस्टर्ड पोस्ट बंद केले जाणार असले तरी, स्पीड पोस्टद्वारे अनेक सुविधा अजूनही उपलब्ध असतील, ज्यामध्ये ट्रॅकिंग सुविधा, फास्ट डिलिव्हरी आणि डिलिव्हरी अॅक्नॉलेजमेंट यांचा समावेश आहे. भारतीय पोस्टचा हा निर्णय देशाच्या पोस्टल सेवा रचनेत मोठा बदल आहे. एकीकडे स्पीड पोस्ट सेवा जलद आणि आधुनिक करेल, तर दुसरीकडे वाढत्या खर्चामुळे सामान्य लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकतं.

टॅग्स :पोस्ट ऑफिस