Join us

पंतप्रधान मोदी यांची अर्थतज्ज्ञांशी चर्चा, बजेटची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 04:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अर्थतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील जाणकारांशी बैठक घेऊन चर्चा केली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अर्थतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील जाणकारांशी बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीला तरुण उद्योजकही उपस्थित होते. वृद्धीला चालना देण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय योजण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली ही बैठक अडीच तास चालली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तज्ज्ञांनी अनेक सूचना केल्या. वित्त वर्ष २०१९-२० मध्ये वृद्धीदर ५ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता असून, हा अर्थव्यवस्थेचा ११ वर्षांचा नीचांक ठरणार आहे.कर्ज विस्तार, निर्यात वृद्धी, सरकारी बँकांचे व्यवस्थापन, उपभोग वाढ आणि रोजगारनिर्मिती याकडे लक्ष देण्याची विनंती तज्ज्ञांनी पंतप्रधानांना केली. सुमारे ४० अर्थतज्ज्ञ व जाणकार बैठकीला उपस्थित होते. सूचनांवर अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन मोदी यांनी या वेळी दिले.नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ज्ञ व उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या जाणकारांशी आज सविस्तर चर्चा केली. आर्थिक वृद्धी, स्टार्टअप आणि नवीन तंत्रज्ञान यावर नीति आयोगाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली.’या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी, वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल, नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, सीईओ अमिताभ कांत आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये अर्थतज्ज्ञ व उद्योग क्षेत्रांचे जाणकार होते. एनआयपीएफपीच्या अर्थतज्ज्ञ इला पटनाईक, माजी मुख्य आर्थिक सल्लागार शंकर आचार्य, आयजीआयडीआरचे प्रा. आर. नागराज, केकेआर इंडियाचे सीईओ संजय नायर, आथर एनर्जीचे सहसंस्थापक व सीईओ तरुण मेहता, मेक माय ट्रिपचे दीप कालरा, डाबर इंडियाचे मोहित मल्होत्रा, बंधन बँकेचे एमडी व सीईओ चंद्रशेखर घोष आणि क्रिसिलच्या एमडी व सीईओ आशू सुयश आदी मंडळींनी बैठकीत अनेक सूचना केल्याचे समजते.>अर्थसंकल्पासाठी मागविल्या लोकांच्या सूचनाआगामी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सामान्य नागरिकांनी आपले विचार व सूचना मांडाव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी यांनी म्हटले, केंद्रीय अर्थसंकल्प १३0 कोटी भारतीयांच्या आशा, आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतो. भारताला विकासाच्या दिशेने घेऊन जातो. या वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी आपले विचार आणि सूचना पाठविण्यासाठी मी आपणा सर्वांना आमंत्रित करतो.

टॅग्स :नरेंद्र मोदी