Join us

"देशाला समृद्ध करणारा अन् नव्या उंचीवर नेणारा हा अर्थसंकल्प" : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 14:54 IST

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. महत्त्वाचे म्हणजे करदात्यांना मोठा दिलासा देत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली आणि टॅक्स स्लॅबमध्येही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे सामान्यांवर यांचा काही प्रमाणात परिणाम होणार आहे. दुसरीकडे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासाला नवी गती मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सर्वसाधारण अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "हा अर्थसंकल्प नव्या उंचीवर नेणारा आहे. या महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पासाठी मी देशवासीयांचे अभिनंदन करतो. हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला बळ देणारा असून, देशातील खेड्यापाड्याला, गरीबांना आणि शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेणारा आहे. मध्यमवर्गाला नवे बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे महिलांचा आर्थिक सहभाग सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

"गेल्या १० वर्षात २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. हा अर्थसंकल्प नव्या मध्यमवर्गाच्या सक्षमीकरणासाठी आहे. या अर्थसंकल्पातून तरुणांना भरपूर संधी मिळणार आहेत. हा अर्थसंकल्प शिक्षण आणि कौशल्याला नवा आयाम देणार आहे. या अर्थसंकल्पामुळे नव्या मध्यमवर्गालाही बळ मिळणार आहे. या अर्थसंकल्पामुळे महिला, छोटे व्यावसायिक, एमएसएमई यांना मदत होणार आहे," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"या अर्थसंकल्पामुळे व्यापारी आणि लघु उद्योगांना प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. अर्थसंकल्पात उत्पादन आणि पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि गतीही कायम राहील. रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करणे ही आपल्या सरकारची ओळख आहे. आजचा अर्थसंकल्प याला आणखी बळ देणारा आहे. या अर्थसंकल्पात सरकारने रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनाची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत आयुष्यातील पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना आमचे सरकार पहिले वेतन देणार आहे. कौशल्य विकास आणि उच्च शिक्षणासाठी मदत असो किंवा एक कोटी तरुणांसाठी इंटर्नशिप योजना असो. तरुण-तरुणी देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करतील. त्यांच्यासाठी शक्यतांचे नवे दरवाजे उघडतील," असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :अर्थसंकल्प 2024नरेंद्र मोदीनिर्मला सीतारामन