Join us  

Petrol Diesel Price : पेट्रोल, डिझेलचे दर ५-६ रुपयांनी वाढणार; लवकरच दरवाढीचा भडका उडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 5:50 PM

Fuel Price Hike : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा तुटवडा

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे लवकरच भारतात पेट्रोल, डिझेलचे दर ५ ते ६ रुपयांनी वाढतील, अशी शक्यता एका अहवालातून समोर आली आहे. सौदी अरेबियातील सौदी अराम्को कंपनीवर ड्रोन हल्ले झाल्याचा फटका भारताला बसणार आहे. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या सौदी अराम्कोकडून होणाऱ्या खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं लवकरच इंधन दरवाढीचा भडका उडू शकतो. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीच्या अहवालातून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतींमुळे इंडियन ऑईल, एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. 'खनिज तेलाचे दर वाढत असल्यानं सरकारी तेल कंपन्यांचा तोटा वाढू शकतो. त्यामुळे लवकरच त्यांच्याकडून भाव वाढ केली जाऊ शकते,' असं कोटकनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. भारताच्या एकूण आयातीचा विचार केल्यास त्यात सर्वाधिक वाटा खनिज तेलाचा आहे. भारत दररोज ५.७ मिलियन बॅरल खनिज तेल आयात करतो. त्यामुळे खनिज तेलाचे दर वाढल्यास व्यापारी तूटदेखील वाढू शकते.खनिज तेलाचे दर सध्या १० टक्क्यांनी वाढले आहेत. याशिवाय भारतीय रुपयाचं मूल्य ०.५ टक्क्यांनी घसरलं आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या आयातीवरील खर्च वाढणार आहे. याचा परिणाम सध्या अडचणींचा सामना करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल. सौदी अराम्को लवकरच संपूर्ण ताकदीनं उत्पादन सुरू करुन आंतरराष्ट्रीय बाजारातला खनिज तेलाचा पुरवठा सुरळीत करेल, अशी माहिती सौदी अरेबियानं दिली आहे. याशिवाय अमेरिकादेखील त्यांच्याकडे असणारा तेलाचा साठा बाजारात आणू शकते. एक ते दोन दिवसात सौदी अराम्कोला खनिज तेलाचं उत्पादन रुळावर आणण्यात यश आल्यास भारताला दिलासा मिळेल. मात्र इराण आणि सौदी अरेबियातला तणाव वाढल्यास भारताला फटका बसेल. आंतरराष्ट्रीय बाजारातला तेलाचा पुरवठा कमी झाल्यास किमती वाढतील. याचे विपरित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतील. याशिवाय रुपयाचं मूल्य आणखी घसरुन ते डॉलरच्या तुलनेत ७२-७२.२० वर जाईल, अशी माहिती इंडिया निवेशच्या फॉरेक्स बँकिंग विभागाचे संचालक मनोज जैन यांनी दिली.  

टॅग्स :पेट्रोलडिझेलसौदी अरेबियाखनिज तेलइंधन दरवाढ