Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलची तुर्तास दरवाढ नाही; कॅनडावरुन LPG आयात करणार, सरकारकडून मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:18 IST

Petrol Diesel LPG Latest Updates: इराण इस्रायल अमेरिका युद्धाच्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालीये.

Petrol Diesel LPG Latest Updates: इराणइस्रायल अमेरिका युद्धाच्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं तेजी दिसून येत आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर सुमारे १६ टक्क्यांनी वधारून ८५ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेलेत. आज ब्रेंट क्रूडचा दर ८५.४१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. मात्र, मोदी सरकारनं स्पष्ट केलंय की, कच्च्या तेलाच्या किमतीतील या वाढीचा भारतीय ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

भारताकडे पुरेसा साठा उपलब्ध

केंद्र सरकारने खात्री दिली आहे की, भारताकडे पुरेशा प्रमाणात तेल आणि गॅस साठा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती वाढल्या असूनही भारतात तूर्तास दरवाढ होणार नाही. पेट्रोलियम मंत्रालयानुसार, एलपीजीसाठी भारत केवळ कतारवर अवलंबून नाही; ऑस्ट्रेलिया आणि कॅनडानं देखील गॅस पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.

चांदी ४,६७४ रुपयांनी महागली, सोन्यातही मोठी तेजी; पटापट चेक करा दिल्ली, मुंबई, पाटण्यातल लेटेस्ट रेट

भारतानं शोधल्या नवीन बाजारपेठा

ऊर्जा सुरक्षेसाठी भारतानं नवीन बाजारपेठा शोधल्या असल्याचा दावा मंत्रालयानं केलाय. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, भारत या क्षेत्रातील सर्व संबंधित देशांच्या संपर्कात आहे. दरम्यान, सरकारनं रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढवली असून, एकूण गरजेच्या सुमारे १० टक्के एलपीजी अमेरिकेकडून घेण्यास सुरुवात केली आहे.

कतारच्या निर्णयाचा परिणाम आणि उपाययोजना

युद्धजन्य परिस्थितीमुळे कतारनं आपलं गॅस उत्पादन पूर्णपणे बंद केलंय. भारत सध्या १९५ दशलक्ष मेट्रिक स्टँडर्ड क्यूबिक मीटर गॅस आयात करतो, ज्यापैकी केवळ ६० एमएमएससीएम (सुमारे ३० टक्के) कतारकडून येतो. ही तूट भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गरज पडल्यास, गॅस कंपन्या उद्योगांना केल्या जाणाऱ्या पुरवठ्याबाबत आपले प्राधान्यक्रम ठरवू शकतात.

घरगुती गॅस पुरवठ्यावर परिणाम नाही

गॅसची कमतरता भासली तरी त्याचा घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं सरकारनं म्हटलंय. उद्योगांकडे ऊर्जेचे पर्यायी स्रोत उपलब्ध असल्यानं कंपन्या त्यांना प्राधान्यक्रमानुसार गॅस देऊ शकतात. मात्र, सध्या तरी अशी कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही.

५० दिवसांचा तेल साठा शिल्लक

मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे २५ दिवसांहून अधिक काळ पुरेल इतकं कच्चं तेल आणि पुढील २५ दिवसांच्या गरजेनुसार पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहे. परिस्थिती पूर्णपणे सामान्य असून देशात एलपीजी, सीएनजी आणि एलएनजीची कोणतीही टंचाई नाही. सरकार सातत्यानं इतर देशांशी आणि पुरवठादारांशी संवाद साधत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : No Petrol-Diesel Price Hike Soon; India to Import LPG from Canada

Web Summary : Despite rising global crude oil prices due to international tensions, the Indian government assures no immediate petrol-diesel price hike. India has sufficient oil and gas reserves and is diversifying LPG imports, including from Canada, to ensure a steady supply and avoid impacting domestic consumers.
टॅग्स :पेट्रोलडिझेलइराणइस्रायलअमेरिका