Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 05:09 IST

या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ९१.८ रुपये लिटर झाले. पेट्रोलचा दर मुंबईत ९८.१२ रुपये, कोलकोत्यात ९१.९२ रुपये आणि चेन्नईत ९३.६२ रुपये लिटर झाला. 

 नवी दिल्ली : देशातील पेट्रोल- डिझेलच्या दरात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल २५ ते २७ पैशांनी, तर डिझेल ३३ पैशांनी महागले आहे.या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ९१.८ रुपये लिटर झाले. पेट्रोलचा दर मुंबईत ९८.१२ रुपये, कोलकोत्यात ९१.९२ रुपये आणि चेन्नईत ९३.६२ रुपये लिटर झाला. डिझेलचा दर मुंबईत ८९.४८ रुपये, दिल्लीत ८२.३६ रुपये, कोलकोत्यात ८५.२० रुपये आणि चेन्नईत ८७.२५ रुपये लिटर झाला.जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे आगामी काळात पेट्रोल- डिझेलचे दर आणखी वाढतील, असे सूत्रांनी सांगितले. सोमवारी ब्रेंटच्या क्रूडचे दर ४ सेंटस्‌नी वाढून ६८.३२ डॉलर प्रतिबॅरल, तर डब्ल्यूटीआय क्रूडचे दर २ सेंटस्‌नी वाढून ६४.९२ डॉलर प्रतिबॅरल झाले. दोन्ही तेलांचे दर मागील आठवड्यात १ टक्क्याने वाढले आहेत. यंदा ब्रेंट क्रुडचे दर तब्बल ३० टक्क्यांनी वाढले आहेत. चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या काळात पेट्रोल- डिझेलची दरवाढ सरकारने रोखून धरली होती. या काळात जागतिक बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे निवडणुका संपताच तेल वितरण कंपन्यांनी दरवाढ सुरू केली आहे.भारतात पेट्रोल- डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही इंधनांचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच्या किमतीतील ६० टक्के, तर डिझेलच्या किमतीतील ५४ टक्के हिस्सा करात जातो. केंद्र सरकारकडून पेट्रोलवर प्रतिलिटर ३२.९० रुपये, तर डिझेलवर ३१.८० रुपये उत्पादन शुल्क आकारले जाते. याशिवाय राज्यांकडून दोन्ही इंधनांवर स्वतंत्रपणे व्हॅट आकारला जातो.  

टॅग्स :पेट्रोलडिझेलपैसा