Join us

एचडीएफसीला नवीन क्रेडिट कार्ड देण्याची मुभा, रिझर्व्ह बँकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 06:26 IST

HDFC Bank : एचडीएफसी बँकेने शेअर बाजारात दाखल केलेल्या नियामकीय दस्तऐवजात  म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने १७ ऑगस्ट २०२१ रोजी एका पत्राच्या माध्यमातून नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर लावण्यात आलेले प्रतिबंध हटविले आहेत.

नवी दिल्ली : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक ‘एचडीएफसी’ला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने अखेर दिली आहे. बँकेवर आठ महिन्यांपासून लावण्यात आलेली बंदी आता उठविण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेने बुधवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. मागील दोन वर्षांत एचडीएफसी बँकेची इंटरनेट बँकिंग सेवा तसेच मोबाईल बँकिंग आणि अदायगी सेवा यांत अडथळे आल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. त्यावरून रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एक आदेश जारी करून एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली होती. ही बंदी आता उठविण्यात आली आहे.एचडीएफसी बँकेने शेअर बाजारात दाखल केलेल्या नियामकीय दस्तऐवजात  म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने १७ ऑगस्ट २०२१ रोजी एका पत्राच्या माध्यमातून नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर लावण्यात आलेले प्रतिबंध हटविले आहेत. डिजिटल व्यवसायावरील प्रतिबंध मात्र पुढील आढावा येईपर्यंत लागू राहतील. आम्ही रिझर्व्ह बँकेसोबत काम करीत राहू, तसेच सर्व नियमांचे पालन करीत राहू.सुत्रांनी सांगितले की, एचडीएफसी बँकेवर लावण्यात आलेल्या प्रतिबंधांचा सध्याच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांवर कोणताही परिणाम झालेला नव्हता. जूनपर्यंत बँकेच्या क्रेडिट कार्डांची संख्या १.४८ कोटी होती.

टॅग्स :एचडीएफसीभारतीय रिझर्व्ह बँक