Paytm Gets ED Notice : नोटाबंदीनंतर मालामाल झालेली फिनटेक फर्म पेटीएम पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. त्याची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडवर फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. लिटल इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड आणि नियरबाय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या २ उपकंपन्यांना ईडीची नोटीस प्राप्त झाली आहे. हे प्रकरण ६११ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या व्यवहारांशी संबंधित आहे.
FEMA उल्लंघनाबद्दल सूचना प्राप्त झाली पीटीआयच्या अहवालानुसार, पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशनला तिच्या उपकंपनी लिटल इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड आणि नियरबाय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी संबंधित व्यवहारांबाबत ED ची नोटीस मिळाली आहे. कंपनीच्या वतीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. यामध्ये २८ फेब्रुवारी रोजी ईडीने फेमा उल्लंघनाची नोटीस पाठवल्याचे सांगितले आहे.
पेटीएम सेवेवर प्रभाव पडणार नाहीनोटीस मिळाल्यानंतर कायद्यानुसार या प्रकरणाचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याचा पेटीएम वापरकर्ते आणि सेवांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केलं. विशेष म्हणजे ज्या कंपन्यांसाठी पेटीएमच्या मूळ कंपनीला नोटीस मिळाली आहे, त्या कंपन्यांचे २०१७ मध्ये अधिग्रहण करण्यात आले होते. २०१५ ते २०१९ या वर्षांमध्ये फेमा कायदा १९९९ च्या काही तरतुदींच्या उल्लंघनाबाबत ही नोटीस देण्यात आली आहे.
एक्सचेंज फाइलिंगनुसार, ६११.१७ कोटी रुपयांच्या एकूण व्यवहारांपैकी सुमारे ३४४.९९ कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे व्यवहार LIPL शी जोडलेले आहेत, तर २४५.२० कोटी रुपये OCL आणि उर्वरित २०.९७ कोटी रुपये NIPL शी संबंधित आहेत.
फेमा कायदा काय आहे?FEMA म्हणजे परकीय चलन व्यवस्थापन कायदा, जो परकीय चलन व्यवस्थापन आणि विदेशी व्यापार आणि देयके यांच्याशी संबंधित कायदा आहे. देशाबाहेरील व्यापार आणि देयकांचे नियमन करण्यासाठी तसेच भारतातील परकीय चलन बाजाराचे व्यवस्थापन आणि देखरेख करण्यासाठी हा कायदा आहे. या कायद्यांतर्गत, अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीला परकीय चलन कायदे आणि नियमांचे संशयित उल्लंघन तपासण्याची, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि त्यांच्यावर दंड आकारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.