Join us

पॅन कार्ड स्कॅमने खळबळ! लाखो ग्राहकांच्या पोस्ट ऑफिस खात्यातून काढले जातायेत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:06 IST

PAN Card Scam : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनी आपल्या लाखो ग्राहकांना सायबर क्राईमपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

PAN Card Scam : तुमचं पोस्ट ऑफिस पेमेंट बँकेत खातं असेल तर तुम्हाला सावध करणारी बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकचे (IPPB) अनेक ग्राहक फिशिंग घोटाळ्याला बळी पडलेत. पॅन कार्डचा वापर करुन लोकांची बँक खाती रिकामी केली जात आहे. तुम्हालाही असा मॅसेज किंवा कॉल आला तर सावध व्हा. कुठलीही संवेदनशील माहिती शेअर करू नका, असे आवाहन IPPB ने आपल्या ग्राहकांना केलं आहे. पॅनकार्ड घोटाळा नेमका कसा चालतो?आयपीपीबीच्या ग्राहकांना पॅनकार्डची माहिती अपडेट करण्यास सांगणारे मेसेज येत आहेत. पॅन कार्डचे तपशील अपडेट केली नाही तर तुमचं बँक खाते ब्लॉक केले जाईल, असा इशारा दिला जातो. या संदेशांमध्ये एक लिंक देखील असते, ज्यावर क्लिक केल्यानंतर ग्राहक स्कॅमरच्या जाळ्यात अडकतात. सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक टीमने हे मेसेज फसवे असल्याचे व्हेरिफाय केले आहे. इंडिया पोस्ट असे संदेश पाठवत नाही किंवा पाठवणार नसल्याचेही स्पष्ट केलं. ग्राहकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.

पीआयबीने इशारा दिलासोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये पीआयबीने म्हटले आहे की, तुम्ही तुमचे पॅन कार्ड अपडेट न केल्यास तुमचे पोस्ट पेमेंट बँक खाते येत्या २४ तासांत ब्लॉक केले जाईल, असे मॅसेज अनेकांना येत आहेत. पण, हा दावा खोटा आहे. इंडिया पोस्ट ऑफिस कधीही असे संदेश पाठवत नाही.

फिशिंग घोटाळा कसा होतो?फिशिंग स्कॅम हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे जो ईमेल, टेक्स्ट मेसेज, फोन कॉल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून लोकांना लक्ष्य करतो. फिशिंग हल्ल्याचा उद्देश एखाद्याला फसवून माहिती मिळवणे, जसे की आर्थिक माहिती, सिस्टम लॉगिन क्रेडेन्शियल्स किंवा इतर कोणतीही माहिती मिळवणे हा आहे.

ग्राहकांनी काय करावं?पोस्ट ऑफिस पेमेंट्स बँकेने या सायबर क्राईमपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पोस्टमध्ये पासवर्ड नियमितपणे अपडेट करणे, बनावट ग्राहक सेवा क्रमांकांपासून दूर राहणे, खात्यांचे निरीक्षण करणे आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळणे यावर भर देण्यात आला आहे. सार्वजनिक वायफाय वापरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :पोस्ट ऑफिसपॅन कार्डसायबर क्राइम