Join us

PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 08:24 IST

PAN 2.0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं सोमवारी नवं क्यूआर कोड आधारित पॅन कार्ड जारी करण्यासाठी १,४३५ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिली. हे पॅन अतिशय सुरक्षित असेल असं सांगण्यात येतंय.

PAN 2.0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं सोमवारी नवं क्यूआर कोड आधारित पॅन कार्ड जारी करण्यासाठी १,४३५ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिली. पुढील वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा उद्देश पॅन जारी करण्याच्या विद्यमान प्रणालीला पुढे नेण्याचा आहे. पॅन २.० प्रकल्पांतर्गत क्यूआर कोड आधारित प्रगत प्रणाली सुरू केल्यानं बनावट कार्ड ओळखणं सोपं होणार असून करदात्यांकडे एकापेक्षा अधिक पॅनकार्ड असू शकणार नाहीत. इतकंच नाही तर नव्या पॅनकार्डनं फसवणूक करणं खूप अवघड होणार असून सर्वसामान्यांना त्यापासून संरक्षण मिळणार आहे.

इन्स्टंट व्हेरिफिकेशनची सुविधा

ज्या लोकांकडे आधीच पॅनकार्ड आहे त्यांना नवीन कार्डसाठी अर्ज करणं बंधनकारक नाही, असं आयकर विभागानं म्हटलंय. जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या विद्यमान पॅन कार्डमध्ये काही सुधारणा किंवा अपडेट करायचं असेल तर ते पॅन २.० प्रकल्पांतर्गत नवीन कार्डसाठी अर्ज करू शकतात. तज्ज्ञांच्या मते, पॅन २.० अंतर्गत क्यूआर कोडसह नव्यानं अपग्रेड केलेल्या पॅन कार्डमुळे फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्याचबरोबर नव्या पॅन कार्डच्या माध्यमातून इन्स्टंट व्हेरिफिकेशनही मिळणार आहे.

सर्वसामान्यांना संरक्षण कसं मिळणार?

नवीन पॅन कार्ड क्यूआर कोडसह येईल, त्यामुळे डुप्लिकेट कार्ड तयार करणं किंवा त्यात छेडछाड करणे खूप अवघड आहे. क्यूआर कोडमध्ये एन्क्रिप्टेड पर्सनल डेटा असतो, जो केवळ एखाद्या विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करून अधिकृत लोक पाहू शकतात. त्यामुळे नवीन कार्डमधून तपशील काढणं फसवणूक करणाऱ्यांना खूप अवघड जाईल आणि आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याचा धोकाही कमी होईल. सामान्यत: फसवणूक करणारे आपल्या पॅन कार्डवरील नाव आणि फोटो बदलतात, तर पॅन क्रमांक तसाच राहतो. पॅनवरील क्यूआर कोडमुळे वित्तीय संस्था तुमच्या वैयक्तिक माहितीची तत्काळ पडताळणी करू शकतील.

टॅग्स :पॅन कार्डइन्कम टॅक्ससरकारनरेंद्र मोदी