Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला युद्धाचा मोठा फटका! विमानाचं इंधन ४७२ रुपये लिटर; PIA बंद होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 19:44 IST

पाकिस्तानची सरकारी एअरलाईन PIA बंद होण्याच्या मार्गावर आहे. विमान इंधनाचे दर १५० टक्क्यांनी वाढून ४७२ रुपये लिटर झाले आहेत.

आधीच आर्थिक गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानसमोर आता एक नवे संकट उभे ठाकले आहे. पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी 'पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स' आता कायमची बंद होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. विमान इंधनाच्या किमतीत अवघ्या काही दिवसांत १५० टक्यांची अवाढव्य वाढ झाल्याने विमाने उडवणे आता पीआयएच्या आवाक्याबाहेर गेले आहे. एअरलाईनचे अध्यक्ष आरिफ हबीब यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर परिस्थिती सुधारली नाही तर आम्हाला सर्व उड्डाणे थांबवावी लागतील.

इंधनाचे दर ऐकून फुटेल घाम!

पाकिस्तानमध्ये विमान इंधनाच्या किमतीत झालेली वाढ ही कोणत्याही अधिकृत घोषणेशिवाय गुपचूप लागू करण्यात आली आहे. १ मार्च रोजी जे विमान इंधन १९० रुपये प्रति लिटर होते, त्याचे दर २१ मार्चपर्यंत तब्बल ४७२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. केवळ एका दिवसात इंधनाचे दर २१ टक्क्यांनी वाढवण्यात आले. एवढ्या महागड्या दराने विमाने उडवणे कोणत्याही कंपनीला परवडणारे नाही, परिणामी या दरवाढीचा संपूर्ण बोजा आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर पडणार आहे.

पीआयए अध्यक्षांची गंभीर चेतावणी

पीआयए कन्सोर्टियमचे अध्यक्ष आरिफ हबीब यांनी रविवारी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली हतबलता व्यक्त केली. "ज्या वेगाने इंधनाचे दर वाढत आहेत, ते पाहता एअरलाईनचे कामकाज सुरू ठेवणे अशक्य झाले आहे. आम्हाला आमची सेवा बंद करण्यास भाग पाडले जात आहे," असे हबीब यांनी म्हटले आहे. देशाच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या प्रमुखांनी असे विधान करणे, हे पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचे जिवंत उदाहरण मानले जात आहे.

युद्धाची झळ पाकिस्तानला

विमान इंधनाच्या या दरवाढीमागे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध हे मुख्य कारण आहे. या आंतरराष्ट्रीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. इंधनाचा पुरवठा कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्या असून, त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानसारख्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशाला बसत आहे. हजारो प्रवाशांचे भवितव्य आता अधांतरी असून, पाकिस्तानचे आकाश लवकरच रिकामे होणार का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's PIA faces collapse as fuel hits ₹472/liter

Web Summary : Pakistan's PIA teeters on the brink of collapse as fuel prices skyrocket to ₹472 per liter. Crippled by a 150% fuel price surge, PIA warns of halting flights, a stark indicator of Pakistan's economic crisis exacerbated by global tensions.
टॅग्स :पाकिस्तानदर वाढइंधन दरवाढ