Join us

पाकिस्ताचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:35 IST

Pakistani Airspace: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे, अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आता पाकिस्तानी हवाई हद्दीतून प्रवास करणे टाळत आहेत.

Pakistani Airspace : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. सरकारने पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. आधी सिंधू पाणी करार रद्द केला नंतर अटारी बॉर्डन बंद करुन व्यापार थांबवला. यामुळे शेजारी राष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच पाकिस्तान डबघाईला आलेला असताना हे निर्णय म्हणजे आर्थिक कंबरडं मोडण्यासारखं आहे. अशा परिस्थितीत लुफ्थांसा आणि एअर फ्रान्स सारख्या अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आता पाकिस्तानी हवाई हद्द टाळण्यासाठी इतर मार्गांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी समोर आलेल्या फ्लाइट ट्रॅकिंग डेटातून ही माहिती समोर आली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेला निर्णयपहलगाम हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्ताननेही भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करून प्रत्युत्तर दिले. परंतु इतर आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांवर कोणतेही निर्बंध लादले नाहीत. तरीही भारताच्या धाकाने काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्यास नकार दिला आहे. लुफ्थांसा ग्रुपने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला माहिती दिली की आशियाई देशांमध्ये प्रवास करण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने त्यांची उड्डाणे पाकिस्तानी हवाई हद्दीचा अनिश्चित काळासाठी वापर करणार नाहीत.

पाकिस्तानला मोठा आर्थिक फटकाविमान कंपन्यांनी हवाई हद्द वापरण्यास बंद केल्याने पाकिस्तानच्या महसूलात मोठी घट झाली आहे. डेटानुसार, रविवारी लुफ्थांसाच्या फ्रँकफर्ट ते दिल्ली फ्लाइट (LH760) ला नवीन मार्गामुळे प्रवास पूर्ण करण्यासाठी एक तास अतिरिक्त लागला. यामुळे पाकिस्तानसोबत विमान कंपन्यांचाही तोटा होत आहे. कारण, प्रवासाचा वेळ तर वाढण्यासोबत इंधनाचा वापरही वाढत आहे.

वाचा - पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

पाकिस्तानी हवाई हद्द बायपासयाशिवाय, फ्लाइट ट्रॅकिंग सिस्टीमवरून असे दिसून आले की ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स आणि एमिरेट्सच्या फ्लाइट दिल्लीमार्गे त्यांचे मार्ग बदलत आहेत. अरबी समुद्र ओलांडल्यानंतर, ते पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळत असून प्रवासासाठी बहुतेक उत्तरेकडील मार्ग निवडत आहेत. ब्रिटिश एअरवेज आणि एमिरेट्सने अद्याप या विषयावर सार्वजनिकपणे भाष्य केलेले नाही. पण, वाढत्या प्रादेशिक अस्थिरतेचे कारण देत एअर फ्रान्सने पाकिस्तानी हवाई हद्दीतून त्यांची उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

टॅग्स :पहलगाम दहशतवादी हल्लापाकिस्तानविमानअर्थव्यवस्था