Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगाल पाकिस्तानवर महागाईचा मारा; पाक सरकार पुन्हा IMF समोर हात पसरणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:12 IST

Pakistan Crude Import: इराण-इस्त्रायल संघर्षाचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम; पेट्रोल ३२१.१७ रुपये प्रति लिटरवर!

Pakistan Crude Import: आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी खोलात जात आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यात वाढलेल्या तणावामुळे पाकिस्तानच्या तेल आयातीवरील खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास पाकिस्तानचा मासिक तेल आयात खर्च सुमारे ६०० मिलियन डॉलर्स (सुमारे ५ हजार कोटी रुपये) इतका वाढू शकतो.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या अहवालानुसार, पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी सांगितले की, वाढत्या आर्थिक दबावातून दिलासा मिळावा यासाठी सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे पेट्रोलियम लेवी (कर) कमी करण्याची विनंती करणार आहे.

तेल आयात खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता

रविवारी पत्रकारांशी बोलताना औरंगजेब म्हणाले की, मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती कायम राहिल्यास पाकिस्तानचा मासिक तेल आयात खर्च ६०० मिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकतो. वाढत्या तेलाच्या किंमतींचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार पर्यायी उपाययोजना आखत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी देशात इंधन बचतीवर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे. उपलब्ध इंधन साठा अधिक काळ टिकावा यासाठी विविध उपायांचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच तेलपुरवठा सुरळीत राहावा यासाठी पाकिस्तान ओमान आणि सौदी अरेबिया सारख्या देशांशी संपर्कात असून, स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यतिरिक्त इतर पर्यायी मार्गांनी तेल आयात करण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत.

पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढ

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील शहबाज सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. सरकारने दोन्ही इंधनांच्या किंमती ५५ पाकिस्तानी रुपये प्रति लिटर इतक्या वाढवल्या आहेत.

दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत ३२१.१७ PKR प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ३३५.८६ PKR प्रति लिटर झाली आहे. रमजान महिन्यात आधीच वाढलेल्या खर्चामुळे नागरिक त्रस्त असताना इंधन दरवाढीमुळे घरगुती बजेटवर आणखी ताण पडल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

विदेशी चलन साठ्यावर वाढता दबाव

सध्या पाकिस्तानकडे सुमारे २१.४३ अब्ज डॉलर्स इतका विदेशी चलन साठा आहे. त्यापैकी स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) कडे सुमारे १६.३ अब्ज डॉलर्, साठा उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत तेल आयातीवर अतिरिक्त ६०० मिलियन डॉलर्स खर्च झाल्यास देशाच्या विदेशी चलन साठ्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

पाक आधीच कर्जात बुडालेला

पाकिस्तानवर आधीच सुमारे २३ अब्ज डॉलर्सचे परदेशी कर्ज बाकी आहे. त्यामुळे तेलाच्या वाढत्या आयात बिलामुळे मोठ्या प्रमाणावर डॉलर खर्च होणार असून, कर्जाच्या हप्त्यांची परतफेड करण्यासाठी पाकिस्तानला पुन्हा नवीन कर्ज किंवा कर्ज रोलओव्हरचा आधार घ्यावा लागू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Inflation hits Pakistan hard; government seeks IMF bailout again.

Web Summary : Pakistan's economy faces crisis as rising Mideast tensions increase oil import costs. The government may request IMF relief on petroleum levies. With dwindling reserves and huge debts, Pakistan struggles with fuel price hikes and seeks alternative oil routes.
टॅग्स :पाकिस्तानइराणइस्रायलखनिज तेलपेट्रोलडिझेल