Join us

खरीप कांद्याचे यंदा केवळ निम्मे उत्पादन; आवकही घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 06:40 IST

onion : आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लाल कांद्याची रोजची आवक साधारण २० हजार क्विंटल होत आहे.

- योगेश बिडवई

मुंबई : अवेळी पाऊस, काही जिल्ह्यांना बसलेला अतिवृष्टीचा तडाखा यामुळे राज्यात यंदा खरीपाच्या कांद्याचा उतारा अत्यंत कमी येऊन दरवर्षीच्या तुलनेत उत्पादन जवळपास निम्म्यावर आले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. साहजिकच त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवकही रोडावली असून, क्विंटलचे सर्वसाधारण भाव तीन हजार रुपयांवर स्थिरावले आहेत.  फलोत्पादन विभागाने सप्टेंबरमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, साडेसहा लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन अपेक्षित धरले होते; मात्र त्यानंतर काही ठिकाणी अतिवृष्टीचा कांद्याला फटका बसला, त्यामुळे त्यापेक्षाही यंदा खरीपाचे उत्पादन कमी झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लाल कांद्याची रोजची आवक साधारण २० हजार क्विंटल होत आहे. ती निम्म्यापेक्षा कमी आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याला क्विंटलमागे किमान एक हजार तर कमाल ३,५०० रुपये दर मिळत आहे, असे बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.  उन्हाळ कांदा येण्यास महिनाभरापेक्षा अधिक अवकाश असल्याने कांद्याचे घाऊक बाजारातील सर्वसाधारण दर क्विंटलमागे पुढेही तीन हजार रुपयांवर राहण्याची चिन्हे आहेत. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये रोज साधारण ७५ हजार क्विंटल कांदा आवक होत आहे. दरवर्षाच्या तुलनेत त्यात साधारण ५० हजार क्विंटल घट झाली आहे. सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसाने कांदा पीक आलेच नाही, त्यानंतर काही शेतकऱ्यांनी यंदा मक्याचे पीक घेतल्याचे चित्र आहे. 

टंचाईची स्थिती नाहीसध्या खरिपाचा कांदा बाजारात येत आहे. काही ठिकाणी मोठ्या पावसामुळे खरीपाचे उत्पादनच झाले नाही. तेथे लेट खरीप कांदा बाजारात येत आहे. नोव्हेंबरमधील पावसाचाही कांद्याला फटका बसला. यंदा कांद्याला खूपच कमी उतारा मिळाला आहे; मात्र टंचाईची स्थिती नाही. - नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड. 

टॅग्स :कांदा