Join us

वाहनांच्या निर्यातीमध्ये एका टक्क्याने वाढ, आणखी सुधारणा होण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 07:20 IST

vehicle exports : भारतीय वाहन उद्योगाची संघटना असलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)ने ही माहिती जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटानंतर प्रथमच जानेवारी महिन्यामध्ये वाहनांच्या निर्यातीमध्ये वाढ नोंदविली गेली आहे. येत्या काळामध्ये जगभरातील वातावरणामध्ये आणखी सुधारणा होऊन निर्यात वाढण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय वाहन उद्योगाची संघटना असलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)ने ही माहिती जाहीर केली आहे. जानेवारी महिन्यामध्ये भारतीय वाहन कंपन्यांनी ३७,१८७ वाहनांची निर्यात केली आहे. मागील वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये भारतामधून ३६,७६५ वाहनांची निर्यात झाली होती. याचा अर्थ गतवर्षाच्या तुलनेत यंदा निर्यातीमध्ये १.१५ टक्क्यांची वाढ झाली आहे. असे असले, तरी चालू आर्थिक वर्षाचा विचार करता, एप्रिल ते जानेवारी या कालावधीमध्ये भारतामधून झालेली वाहनांची निर्यात गतवर्षापेक्षा ४३.१ टक्क्याने कमी झाली आहे. चालू वर्षामध्ये ३,२८,३६० वाहनांची निर्यात झाली आहे. मागील वर्षांच्या याच कालावधीमध्ये ५,७७,०३६ वाहनांची निर्यात झाली होती. जानेवारी महिन्यामध्ये मारुती सुझुकीच्या निर्यातीमध्ये २९.९२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, ह्युंडाई मोटर्सच्या निर्यातीमध्ये १९ टक्क्यांनी घट झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार करता, सर्वच कंपन्यांची निर्यात घटली आहे. 

जानेवारी महिन्यात प्रथमच मागील वर्षापेक्षा निर्यात वाढलेली दिसत आहे. जगभरामधील बाजारातील स्थिती सुधारत असल्यामुळे, आगामी काळामध्ये निर्यातीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. - राजेश मेनन, महाव्यवस्थापक सियाम

टॅग्स :व्यवसायवाहन उद्योग