Join us

Omicron variant: हवाई प्रवास भाड्यात 100 टक्क्यांची वाढ, नवीन मार्गदर्शक सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 10:00 IST

Omicron variant: कोविड-१९चा ओमायक्रॉन हा नवा विषाणू सापडल्यामुळे सरकारने हवाई प्रवास वाहतुकीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्याचा परिणाम म्हणून अनेक मार्गांवरील आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास भाडे दुपटीने वाढले आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९चा ओमायक्रॉन हा नवा विषाणू सापडल्यामुळे सरकारने हवाई प्रवास वाहतुकीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्याचा परिणाम म्हणून अनेक मार्गांवरील आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास भाडे दुपटीने वाढले आहे. भाडेवाढ झालेल्या मार्गात भारत ते अमेरिका तसेच ब्रिटन, यूएई आणि कॅनडा या देशांचा समावेश  आहे.ओमायक्रॉन विषाणूचा धोका वाढल्यानंतर भारत सरकारने मंगळवारी रात्री नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या सूचनांतील प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे प्रवाशांना विमानतळावर सहा तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. या सूचना १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाल्या आहेत. १४ पेक्षा जास्त देशांसाठी त्या लागू असतील. या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. चाचणी निगेटिव्ह आली तरच प्रवाशास विमानतळाबाहेर पडता येईल. या चाचणीचा अहवाल येण्यास ४ ते ६ तास लागू शकतात. 

..अशी झाली भाडेवाढप्राप्त माहितीनुसार, दिल्ली ते लंडन विमानाचे तिकीट ६० हजार रुपयांवरून १.५ लाख रुपये झाले आहे. दिल्ली ते दुबईचे भाडे २० हजार रुपयांवरून ३३ हजार झाले आहे. दिल्ली ते अमेरिका राउंड ट्रिपचे तिकीट ९० हजार ते १.२ लाख रुपये होते, ते आता १.५ लाख रुपये झाले आहे. शिकागो, वॉशिंग्टन डीसी आणि न्यू यॉर्क सिटीच्या हवाई भाड्यात १०० टक्के वाढ झाली आहे. बिझनेस क्लासचे तिकीट दुपटीने वाढून सहा लाख रुपये झाले आहे. दिल्ली ते टोरांटोचे हवाई भाडे ८० हजारांवरून २.३७ लाख रुपये झाले आहे.

टॅग्स :विमानतळओमायक्रॉनमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस