Strait of Hormuz Crisis : जागतिक तेल बाजारपेठेत सुरू असलेला अनिश्चिततेचा खेळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी किमतीत १० टक्क्यांची मोठी घसरण झाल्यानंतर, मंगळवारी कच्च्या तेलाच्या दराने पुन्हा एकदा १०० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. इराणने अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट करताच बाजारपेठेत पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बाजारपेठेत पुन्हा तेजी का?मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड २.९ टक्क्यांनी वधारून १०२.८४ डॉलरवर पोहोचले, तर 'वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट' ३.५ टक्क्यांनी उसळी घेत ९१.२० डॉलरवर गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगत पाच दिवसांसाठी इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करणार नसल्याचे विधान केले. मात्र, इराणचे संसदेचे सभापती मोहम्मद बागेर कालिबाफ यांनी हे वृत्त फेटाळून लावले. "अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही, ही केवळ बाजारपेठेत घबराट पसरवण्यासाठी दिलेली 'फेक न्यूज' आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. इराणच्या सैन्याने अमेरिकेच्या या दाव्याला 'मानसिक युद्ध' संबोधून नवे हल्ले सुरू केले आहेत. यामुळे युद्ध लवकर संपण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.
पुरवठ्याचा 'चोक पॉईंट' : स्ट्रेंट ऑफ होर्मुजजगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीपैकी सुमारे २० टक्के (१/५ हिस्सा) हा 'स्ट्रेंट ऑफ होर्मुज' या अरुंद सागरी मार्गातून होतो. युद्धामुळे या मार्गावरील टँकरची ये-जा जवळपास बंद झाली आहे. इराणमधील गॅस पाईपलाईन्स आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले जात असल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. मॅक्वेरीच्या अहवालानुसार, जर 'होर्मुज' एप्रिलपर्यंत बंद राहिला, तर ब्रेंट क्रूड १५० डॉलरचा स्तर गाठू शकते. तूर्तास हे दर ८५-११० डॉलरच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
वाचा - युद्धाच्या आगीतून २ भारतीय टँकर सुखरूप बाहेर! ६५ लाख सिलिंडर भरतील एवढा गॅस; किती दिवस पुरेल?
भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम
- भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश असून, आपल्या गरजांसाठी आपण मध्यपूर्वेतील देशांवर अवलंबून आहोत.
- महागाईचा विळखा : तेल महागल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, ज्याचा थेट परिणाम वाहतूक खर्च, शेती आणि कारखानदारीवर होईल. पर्यायाने किराणा, स्वयंपाकाचा गॅस आणि प्रवास महाग होईल.
- शुल्काचा बोजा : भारतीय रिफायनरी कंपन्या सध्या इराणकडून काही प्रमाणात तेल खरेदी करत आहेत, मात्र पुरवठा साखळी तुटल्यास भारताच्या परकीय चलन साठ्यावर मोठा ताण येईल.
- स्ट्रॅटेजिक रिझर्व्हचा वापर : आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी सध्या आशिया आणि युरोपमधील देशांशी चर्चा करत आहे. गरज पडल्यास देशांच्या 'धोरणात्मक साठ्यातून' तेल बाहेर काढले जाऊ शकते.
Web Summary : Hormuz Strait tensions escalate as Iran denies US talks, spiking oil prices. Supply disruptions loom, threatening global markets and impacting India's economy via inflation and strained reserves. Strategic reserves may be tapped.
Web Summary : ईरान ने अमेरिकी वार्ता से इनकार किया, जिससे होर्मुज जलडमरूमध्य में तनाव बढ़ गया और तेल की कीमतें बढ़ गईं। आपूर्ति में व्यवधान का खतरा, वैश्विक बाजारों को खतरा और मुद्रास्फीति और तनावग्रस्त भंडार के माध्यम से भारत की अर्थव्यवस्था पर प्रभाव। रणनीतिक भंडार का उपयोग किया जा सकता है।