Join us

पहिल्या व शेवटच्या श्वासाची साक्षीदार परिचारिकेला प्रतिष्ठा मिळावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 04:39 IST

जागतिक स्तरावर आद्यपरिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल हिचा जन्मदिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. परिचारिका म्हणून महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने परिचारिका म्हणजे महिला परिचारिका हे गुणोत्तर आहे.

- सचिन अडसूळ(जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली)जन्म आणि मृत्यू हे माणसाच्या आयुष्याचे निसर्गचक्र असले, तरी या कालावधीत माणूस स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतो. स्वत:च्या अस्तित्वाला एक नवा आयाम देतो. मात्र, आपण जन्मल्यानंतर घेतलेला तो पहिला श्वास आणि मृत्यूवेळी घेतलेला तो शेवटचा श्वास, या सर्वच घटनांची साक्षीदार असलेली परिचारिका आपल्या फार काही लक्षात राहत नाही. १२ मे हा त्यानिमित्ताने जागतिक स्तरावर ‘ती’च्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच जणू ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जात असावा.जागतिक स्तरावर आद्यपरिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल हिचा जन्मदिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. परिचारिका म्हणून महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने परिचारिका म्हणजे महिला परिचारिका हे गुणोत्तर आहे. पुरुषही या प्रकारची सेवा देत असतात; परंतु, महिलांचे परिचारिका म्हणून असलेले काम सर्वदूर परिचित आहे. नुसतीच सेवा नाही, तर शिस्तबद्ध सेवा हे वैशिष्ट्य परिचारिकेचे पाहावयास मिळते.डॉक्टरांनी सांगितलेल्या उपाययोजना राबविणारी म्हणूनच तिचा परिचय जास्त आहे. सर्वसाधारणपणे सरकारी, निमसरकारी रुग्णालये, खासगी दवाखाने, प्रसूतिगृहे, नर्सिंग होम अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून सेवा दिली जात आहे. औषधे देण्यापासून ते दवाखान्याच्या स्वच्छतेपर्यंत, अगदी रुग्णांच्या मलमूत्र स्वच्छ करण्यापर्यंत सर्व कामे त्यांच्याकडून पार पाडली जातात. परिचारिकांना आपण नेहमीच वेगळ्या प्रकारे ओळखत असतो. नोकर, स्वच्छता कर्मचारी म्हणूनही दुय्यम वागणूक देण्यास आपण मागे-पुढे पाहात नाही. मात्र, ती रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. असंख्य प्रकारच्या ताणतणावात राहूनही तीन-तीन शिफ्टमध्ये काम करून, आपल्या समस्या बाजूला ठेवून अखंड रुग्णसेवा ती देत असते.सध्या जगभर ‘कोविड-१९’च्या सुरू असलेल्या संसर्गावेळी प्रत्येक रुग्णाला सेवा देणारी, त्याची काळजी घेणारी हीच ती परिचारिका. सध्या आणि नेहमीच वैद्यकीय सेवेतील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या परिचारिकेला सुरक्षा आणि प्रतिष्ठा मिळणे गरजेचे आहे. प्रत्येक रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकेला समजून घेणे आवश्यक आहे. परिचर्या हा आरोग्य क्षेत्रातील अविभाज्य घटक आहे आणि ते काम परिचारिका यशस्वीपणे पार पाडत आहेत.जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात सरासरीएक लाख लोकसंख्येमागे फक्त ६१ परिचारिका आहेत, तर ग्रामीण भारतात दहा हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर, तर ५०० लोकांमागे एक परिचारिका आहे. यावरून परिचारिकांची संख्या अत्यल्प असल्याचेसमोर येते. म्हणून त्या पदाला प्रतिष्ठा, मान-सन्मान मिळणे काळाची गरज आहे. असंख्य रुग्णांमागे मोठ्या प्रमाणात परिचर्या करणे आवश्यक आहे. ते काम परिचारिका पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असलेला ताण लक्षात घेणेही या ठिकाणी आवश्यक आहे. आज कोरोना तथा ‘कोविड’च्या या महामारीत डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार हे सगळेजण देवदूतासारखे कर्तव्य बजावत आहेत. सरकारदेखील या महामारीचा प्रचंड मेहनतीने सामना करून त्याला परतवून लावण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. जनतेने या सर्वाला प्रतिसाद दिला, तर या कोरोनाला हरविणे शक्य आहे. त्यासाठी अहोरात्र झटत असणाºया योद्धांना साथ द्या.परिचारिका हा महिलांचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. स्त्री ही प्रेमळ, समर्पणशील तसेच सेवाभावी असते. तिला निसर्गताच मातृत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. तिला कुटुंब संगोपनाचाही अनुभव असतो. ती घरातील प्रत्येकाची काळजी घेत असते, तशीच ती रुग्णांचीदेखील काळजी घेत असते. रुग्णसेवेबरोबर ती ग्रामीण भागात पोषण, आहार, आरोग्य, औषधोपचार मार्गदर्शक म्हणून दुहेरी भूमिका पार पाडत असते. ती फक्त सुशिक्षित नाही, तर ती प्रशिक्षितसुद्धा आहे. गरजवंतांचे संगोपन, पोषणआणि संवर्धन तसेच शारीरिक शिक्षण देण्याचे कार्य ती करत असते. कला, कौशल्य, व्यवसायनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रभावी संगम असलेली ती वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचा घटक आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये ती एक रक्षक, शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करत आहे. या जागतिक परिचारिका दिनानिमित्त तिला मानाचा मुजरा.

टॅग्स :वैद्यकीयआरोग्य